हिंगोलीत दसरा महोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने 

राजेश दारव्हेकर | Monday, 26 October 2020

कोरोनामुळे या वर्षी दसरा व दुर्गा महोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. प्रशासनाने दुर्गा मुर्ती च्या उंचीवर बंधने आणल्याने केवळ चार फूट उंचीच्या मूर्तींची स्थापना करण्यास परवानगी दिल्यामुळे चार फूट एवढ्या उंचीचे दुर्गादेवी आणि इतर देव देवतांचे प्रतीकात्मक पुतळे स्थापन करण्यात आले होते. 

हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव यावर्षी कोरोना सावटामूळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. रविवारी (ता. २५)  रात्री ९.१५ वाजता  रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.

कोरोनामुळे या वर्षी दसरा व दुर्गा महोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. प्रशासनाने दुर्गा मुर्ती च्या उंचीवर बंधने आणल्याने केवळ चार फूट उंचीच्या मूर्तींची स्थापना करण्यास परवानगी दिल्यामुळे चार फूट एवढ्या उंचीचे दुर्गादेवी आणि इतर देव देवतांचे प्रतीकात्मक पुतळे स्थापन करण्यात आले होते. 

सहानंतर मठात प्रवेश बंद

दरम्यान हिंगोली येथील दसरा महोत्सवाचे यावर्षी  १६५ वर्षे आहे. या दसऱ्याला ऐतिहासिक परंपरा असल्यामुळे महोत्सव पाहण्यासाठी जिल्हाभरासह इतरही  जिल्यातील भाविक हजेरी लावतात. परंतु यावर्षी  कोरोना साथीमुळे मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा खाकीबाबा मठात पार पडला. दरवर्षी सीमोल्लंघनासाठी नागरिक खाकीबाबा मठात जातात येथील श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन येथेच एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतात. यावर्षी मात्र येथील मठात दहा नागरिकांना टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येत होते. सहा नंतर मठात प्रवेश बंद करण्यात आला होता. ज्याच्या कडे पास आहेत अशा नागरिकांना सोडण्यात येत होते. 

रामलीलेचे कार्यक्रम देखील साधेपणाने

दरम्यान रात्री ९.१५ वाजता अंत्यत साध्या पध्दतीने मोजक्याच मंडळीच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी न करता रावण दहण करण्यात आले. दरवर्षी हा कार्यक्रम हजारो नागरिकांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात मान्यवरांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतिषबाजीत होतो. यावर्षी मात्र या कार्यक्रमावर बंधने आली होती. रामलीलेचे कार्यक्रम देखील साधेपणाने संपन्न झाले.

संपादन - प्रल्हाद कांबळे