ई ‘सकाळ’चा दणका, रुग्णांना निकृष्ठ जेवण देणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई

गणेश पांडे | Thursday, 13 August 2020

कोरोना बाधित रुग्णांच्या जेवणात मेलेले मुंगळे निघाल्याची बातमी ‘सकाळ’ने प्रकाशित करताच जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत तातडीने या कंत्राटदाराकडून रुग्णांना पुरविले जाणारे जेवण बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

परभणी ः कोरोना बाधित रुग्णांच्या जेवणात मेलेले मुंगळे निघाल्याची बातमी ‘सकाळ’ने प्रकाशित करताच जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत तातडीने या कंत्राटदाराकडून रुग्णांना पुरविले जाणारे जेवण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रुग्णांसोबत झालेल्या या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकामध्ये प्रचंड चिड व्यक्त होत आहे.

कोरोना विषाणु संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे पुरते धिंडवडे निघालेले आहेत. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात चक्क मेलेले मुंगळे आढळल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता.१२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे कोरोना बाधित रुग्णांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. रुग्णांनी थेट जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे त्यांना देण्यात आलेल्या जेवणाचे फोटोच पाठविले होते.

हेही वाचाविनाअनुदानित शाळांवरील शिक्षक हवालदिल, काय आहे कारण?

गुरुवारी चांगले जेवण रुग्णांना पुरविले

औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना शासनाच्यावतीने दररोज जेवण दिले जाते. परंतू, हे जेवण अत्यंत निकृ्ष्ठ दर्जाचे असल्याच्या तक्रारी येत आहेत. बुधवारी (ता.१२) रात्री या रुग्णांना जेवणात भात देण्यात आला. या भातामध्ये चक्क मेलेले मुंगळे असल्यामुळे रुग्ण संतप्त झाले. काही रुग्णांनी तातडीने या पाकिटांचे फोटो काढून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना व्हॉटसअपद्वारे पाठविले. तेव्हाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली जाईल असे या रुग्णांना सांगून शांत केले होते. दरम्यान, रुग्णांना निकृष्ठ जेवण दिले जात असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. रुग्णांनी स्वताच या जेवणाचा पंचनामा करून त्याच्यावर स्वाक्षऱ्या करून त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली होती. झालेला हा प्रकार सकाळने उजेडात आणताच जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने या कंत्राटदाराचे जेवण थांबवावे असे आदेश दिले. गुरुवारी (ता.१३) पासून नवीन कंत्राटदाराकडून चांगले जेवण रुग्णांना पुरविले गेले आहे.
 
येथे क्लिक करापुतण्या मला वाचव... म्हणण्याची काकावर आली वेळ

कंत्राटदाराचे काम थांबविण्यात आले

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ठ जेवण देणाऱ्या कंत्राटदाराचे काम थांबविण्यात आले आहे. या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. लवकरच त्यावर कारवाई केली जाईल. नवीन कंत्राटदार नेमून तातडीने रुग्णांना पोषक व स्वच्छ जेवण पुरवावे असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आले आहेत.
- डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी, परभणी.

संपादन-  प्रल्हाद कांबळे