भूकंप पुनर्वसनाने गुंडाळला गाशा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

सरकारने पुनर्वसनाची ९९ टक्के कामे तडीस नेली आहेत. भूकंपग्रस्तांचे सध्याचे अनेक प्रश्‍न पुनर्वसनानंतर निर्माण झालेले आहेत.
- एस. एस. लामतुरे, कार्यकारी अभियंता

लातूर - किल्लारी (ता. औसा) परिसरात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपानंतर राज्य सरकारने १९९४ पासून पुनर्वसनाचे काम हाती घेतले. पुनर्वसनाचे ९० टक्के काम पाच वर्षांत म्हणजे १९९९ पर्यंत तडीस नेले. त्यानंतर पुनर्वसनाच्या कामासाठी सुरू केलेली तेरापैकी बारा कार्यालये बंद केली. शेवटचे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील एकात्मिक घटक कार्यालय हे कार्यालयही सरकारने बंद करून पुनर्वसन कार्याचा गाशा गुंडाळला आहे. या कामातील नोंदी जतन करून ठेवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविले आहे.      

किल्लारी परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे भूकंप होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले होते. घरे जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतर सरकारने १९९४ पासून पुनर्वसनाचे काम हाती घेतले. यासाठी सरकारने दहा घटक कार्यालये, दोन मंडळ कार्यालये व एक मुख्य अभियंता अशी तेरा कार्यालये सुरू केली होती. लातूरचे एक घटक कार्यालय सोडून सर्व कार्यालये सरकारने १९९९ पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करून टाकली. या स्थितीत भूकंप पुनर्वसनाचे काम संपत आल्याने, एकमेव कार्यालय बंद करून टाकले आहे. कार्यालयाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. एस. लामतुरे यांना जलसंपदा विभागाकडे कार्यमुक्त करण्यात आले आहे. अकरा वर्षांपासून ते या पदावर प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. तब्बल २३ वेळा त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढविण्यात आला होता.

भूकंप पुनर्वसनाची कामे
१३०० कोटी एकूण खर्च
७८० हेक्‍टर जमिनीचे संपादन
२७ गावे शंभर टक्के पुनर्वसन
१८, ३०३ घरांचे बांधकाम
७४९ गावे दुरुस्ती व नवीन घरांसाठी अनुदान
१२ गावे जागेवर पुनर्वसन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake rehabilitation Center Close Killari