वैद्यकीय प्रवेशाची बिकट वाट ‘सकाळ’मुळे सुकर

Sakal-Datta-Deshmukh
Sakal-Datta-Deshmukh

बीड : वडिलांच्या निधनानंतर आईच्या कष्टाचे चिज करुन जिद्द व मेहनतीने अभ्यास करुन नीट (वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत) तब्बल ५५७ गुण मिळविलेल्या अर्चना रोडगे हीच्यासमोर प्रवेश, वस्तीगृह शुल्क कसे भरायचे असा यक्षप्रश्न होता. मात्र, आई लताबाईच्या कष्टाची आणि अर्चनाच्या जिद्दीची कथा सकाळने समोर आणली आणि दानशुरांनी भरभरुन दिले. ‘सकाळ’मुळेच वैद्यकीय प्रवेशाची बिकट वाट सुकर झाल्याची भावना लताबाई रोडगे व अर्चना रोडगे यांनी व्यक्त केली. 

आडस (ता. केज) येथील लता महादेव रोडगे या मध्यवर्गीय दाम्पत्याला अर्चना आणि विशाल ही दोन मुले होती. मात्र, १२ वर्षांपूर्वी अर्चना पहिलीत असतानाच वडिल महादेव रोडगे यांचे निधन झाले. त्यामुळे कुटूंबावर आभाळ कोसळले. एक एकर शेतीत दोन मुले जगवाची कशी आणि शिक्षण कसे द्यायचे असा यक्षप्रश्न लताबाईंसमोर होता. मात्र, त्यांनी खचून न जाता शिवणकाम सुरु केले. मुलाला शिक्षणासाठी माहेरी ठेवले तर मुलगी गावातीलच श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात शिकत होती.

आईचे कष्ट आणि घरच्या परिस्थितीची कायम जाण असलेल्या अर्चनाने दहावीतही ९० टक्के गुण मिळविले. चांगले गुण घेतलेल्या अर्चनाला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. मुलीची जिद्द, आवड आणि मेहनत पाहून जमविलेल्या पुंजी - पुंजीतून लताबाईंनी अर्चनाला उक्कडगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे ११ वीला प्रवेश दिला. याच महाविद्यालयातील वसतीगृहात राहून शिकणाऱ्या अर्चनाने १२ वी विज्ञान परीक्षेत ८७ टक्के गुण मिळविले. तर, वैद्यकीय पूर्व परिक्षेतही (नीट) तिने तब्बल ५५७ गुण मिळविले. त्यामुळे तिचा वैद्यकीय प्रवेश निश्चित मानला जात होता. मात्र, वैद्यकीय प्रवेशाचे शुल्क, पुस्तके, वसतीगृहाचा खर्च कसा करणार असे नवे प्रश्न लताबाई आणि अर्चनासमोर होते. मात्र, या मायलेकींच्या कष्टाची आणि जिद्दीची कहाणी ‘सकाळ’ने ता. ११ जुनच्या अंकात ‘आईच्या कष्टाचे लेकीने जिद्दीने केले सोने‘ या मथळ्याखाली प्रसिद्ध करुन मदतीचे आवाहन केले.

‘सकाळ’च्या बातमीनंतर अनेक सामाजिक, शैक्षणिक संघटना व दानशुरांनी मदतीचे हात पुढे केले. प्रवेशाच्या पहिल्याच फेरीत अर्चनाला मुंबईतील प्रतिथयश जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिचे प्रवेश शुल्क, वस्तीगृहाचे शुल्क आणि पुस्तकांचा खर्च भागेल एवढी रक्कम मदतीच्या माध्यमातून जमा झाली. त्यामुळे कतृज्ञता व्यक्त करण्यासाठी बुधवारी (ता. २४) या मायलेकींनी येथील ‘सकाळ’ विभागीय कार्यालयाला भेट दिली. ‘सकाळ’मुळेच वैद्यकीय प्रवेशाची ‘बिकट वाट सुकर’ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आयुष्याच्या स्वप्नाची पहिली पायरी चढण्यास माझ्या जिद्द आणि कष्टासह सकाळचा वाटा आहे. भविष्यात सामान्यांची सेवा करणे एवढेच ध्येय असल्याचे अर्चनाने सांगीतले. जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख व रवींद्र पालिमकर यांच्या हस्ते या दोघींना सकाळ तर्फे पेन भेट दिला. 

कुठलीही शिकवणी नाही
अलिकडे वैद्यकीय प्रवेशासाठी शिकवणी लावलीच पाहिजे अशी पालकांची मानसिकता आहे. त्यामुळे शहरांमध्ये शिकवणी वर्गांची संख्याही वाढत आहे. मात्र, अर्चनाने कुठलीही शिकवणी लावलेली नाही. महाविद्यालयातील नियमित वर्गासह वसतीगृहात राहून तिने १२ वीला ८७ टक्के आणि वैद्यकीय पुर्व परीक्षेत (नीट) ५५७ गुण मिळविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com