...तर विधानसभेचे इकोफ्रेंडली इलेक्‍शन!

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर, ता. 21 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने हाती घेतलेल्या "स्वच्छता ही सेवा' मोहिमेत यंदा प्लॅस्टिक निर्मूलनाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरे आणि ग्रामीण परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्यात येणार आहे. 11 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम 27 ऑक्‍टोबरपर्यंत चालणार आहे.

काळाची गरज म्हणून या मोहिमेचे उदात्तीकरण करत भारत निवडणूक आयोगानेही पुढाकार घेतला आहे. निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्लॅस्टिक साहित्याचा वापर करू नये, असा सल्ला आयोगाने दिला आहे. हा सल्ला पक्ष व उमेदवारांनी मानला तर विधानसभेची निवडणूकही इकोफ्रेंडली होण्याची शक्‍यता आहे. 


निवडणूक आयोगाने शनिवारी (ता. 21) महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आचारसंहिता लागू केली. निवडणूक कार्यक्रमातील विविध बदल व बंधने स्पष्ट करताना आयोगाने राजकीय पक्षांना काही सल्ले दिले आहेत. त्यात प्लॅस्टिकमुक्तीसाठी पुढाकार घेण्याचा सल्ला महत्त्वाचा ठरला आहे.

"स्वच्छता ही सेवा' या मोहिमेत सरकारने यंदा प्लॅस्टिक निर्मूलनाचा विषय ऐरणीवर घेतला आहे. मोहीम काळातच विधानसभा निवडणूक आल्याने आयोगाने राजकीय पक्ष व उमेदवारांना प्लॅस्टिकचा वापर न करता प्रचार करण्याचा सल्ला दिला आहे. 

प्लॅस्टिकमुक्त दिवाळीकडे वाटचाल 
ता. 11 सप्टेंबरपासून जनजागृती आणि प्लॅस्टिक कचरा संकलनास सुरवात झाली आहे. कोपरा न कोपरा प्लॅस्टिकमुक्त करून संकलित केलेले प्लॅस्टिक तालुका ठिकाणी, तसेच शहरात विविध ठिकाणी स्थापन केलेल्या केंद्रांवर गोळा केले जाणार आहे. महात्मा गांधी जयंतीदिनी (ता. दोन ऑक्‍टोबर) प्लॅस्टिक निर्मूलनासाठीच महाश्रमदान करण्यात येणार असून प्लॅस्टिकमुक्त भारतासाठी सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. महाश्रमदानात शहरे आणि गावागावात प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे विलगीकरण करून रिसायकल किंवा विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यानंतर येणारी दिवाळी प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com