Edible Oil Price : खाद्यतेलाची फोडणी झाली स्वस्त; वर्षभरात लीटरमागे ६० ते ७० रुपयांची घसरण | Edible oil become cheaper drop of Rs 60 to 70 per liter in year | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Edible oil become cheaper drop of Rs 60 to 70 per liter in year

Edible Oil Price: खाद्यतेलाची फोडणी झाली स्वस्त; वर्षभरात लीटरमागे ६० ते ७० रुपयांची घसरण

कुंभार पिंपळगाव : एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे खाद्यतेलाच्या किमती मात्र हळूहळू कमी झाल्या आहेत. १८० रुपये लीटरने विकल्या जाणारी खाद्यतेल आता १२० रुपये लिटरवर आली आहेत.

वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत लीटरमागे ६० ते ७० रुपये कमी झाल्याने सर्वसामान्यांची स्वयंपाकाची फोडणी स्वस्त झाली आहे, मात्र शेंगदाणा आणि करडईच्या तेलाचे भाव मात्र काहीसे तेजीतच आहेत. नव्या करडई बाजारात आल्याने लीटरमागे दहा रुपये कमी झाले आहेत.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच तेलाच्या भावात तेजी व्हायला सुरुवात झाली होती, मात्र दिवाळीनंतर हळूहळू सोयाबीनची आवक वाढली आणि भावात घसरण सुरू झाली. दुसरीकडे खाद्यतेलाची मागणी घटल्याने आणि आवक वाढल्याने सातत्याने भाव घसरतच गेले.

जागतिक बाजारपेठेतून तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत राहिला, यामुळे खाद्यतेलाच्या दरात घटच होत गेली. तेलाचे दर वाढलेले असताना हात आखडता घेत तेल वापरावे लागत होते, अंगणवाडीच्या आहारातूनही तेल गायब झाले होते, आता दर कमी झाल्याने पुन्हा सर्वसामान्यांना दिलासा मिळाला, तेलाची फोडणीही स्वस्त झाली आहे.

का कमी झाले दर

जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा साठा जास्त झाला आहे, भारत वगळता इतर देशातून मागणीही कमी झाली आहे. इंडोनेशिया आणि मलेशियात पाम तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे आणि जागतिक बाजारपेठेत मंदी आहे. आयात शुल्क कपातीमुळे भावात घट झाली आहे.

शेंगदाणा, करडईच्या तेलाला भाव

शेंगदाणा, करडईचे उत्पादन कमी झाल्याने भाव काही प्रमाणात तेजीतच आहेत. शुध्द लाकडी घाण्याच्या करडईचे तेलाचे दर २७० ते ३५० रुपये लीटरपर्यंत आहेत. अनेक जण प्रत्येक महिन्याला आलटून-पालटून तेलाचा वापर करीत आहेत.