गुप्तधन बळीसाठी मांत्रिक आणणार होता सुशिक्षित मुलगी

Mantrik-Balu-Shinde
Mantrik-Balu-Shinde

पीरबावडा/वडोद बाजार - कौटुंबिक कलह दूर करण्याबरोबरच गुप्तधनाच्या लालसेपोटी रांजणगाव (ता. फुलंब्री) येथील शेतात मुलीचा बळी देण्याचा डाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलिसांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी (ता. २४) उधळून लावण्यात आला. दरम्यान, गुप्तधन काढण्यासाठी सुशिक्षित मुलीच्या हातानेच पूजा करावी लागेल व अशी मुलगी आपण घेऊन येतो, असे सांगून मांत्रिकाने जादा पैसे उकळल्याचे समोर आले आहे.  दरम्यान, याप्रकरणी तिघांना पोलिस कोठडी मिळाली.

दवाखान्यात झाली ओळख
रांजणगाव येथील कडुबा जाधव यांच्या कुटुंबीयात काही दिवसांपासून कलह सुरू होता. महिनाभरापूर्वी कुटुंबप्रमुख कडुबा जाधव हा फुलंब्री येथे दातांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. तेथे इमामखाँ हसनखाँ पठाण हाही पत्नीला उपचारासाठी घेऊन आला होता. जाधव व पठाण यांची तेथे ओळख झाली. आपल्या कुटुंबीयात कलह सुरू असल्याचे जाधव यांच्या बोलण्यातून पठाणला कळाले. माझ्या अंगात हजेरी येते असे सांगून, तुमच्या जुन्या जागेवर देवीची सोन्याची मूर्ती, गुप्तधन असल्याने हा कलह होत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

माझ्या ओळखीचा मांत्रिक असून, तो मूर्ती, धन काढून देईल व त्यामुळे तुमच्या घरातील कलह दूर होईल, अशी बतावणी पठाणने केली. जाधव त्याच्या मोहाला बळी पडले. 

महिनाभरात अनेकदा ये-जा
महिनाभरात मांत्रिक बाळू शिंदे, इमाम पठाण हे अनेकवेळा जाधव यांच्या घरी ये-जा करीत होते. ज्या पडक्‍या घरातून मूर्ती, गुप्तधन काढायचे आहे ती जागा मोकळी असल्याने तुमच्या शेतातील राहत्या घराच्या खोलीत पूजा करून मूर्ती, गुप्तधन काढू असे ठरले. या कामाच्या सामग्रीसाठी जाधवकडून वीस हजार रुपये सुरवातीला घेतले. नंतर टप्प्याटप्प्याने दीड लाख रुपये उकळले. 

डाव उधळला
मांत्रिक शिंदे याने बुधवारी (ता. २२) जाधवच्या शेतातील राहत्या खोलीत दिवसभर पूजा केली. सायंकाळी त्या खोलीची चावी आपल्यासोबत नेली. गुरुवारी (ता. २३) ठरल्याप्रमाणे त्या खोलीतून पूजा करून एक धातूची मूर्ती बाहेर काढून, ती सोन्याची असल्याचे सांगितले. मूर्तीला देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवा, शुक्रवारी (ता.२४) आपण गुप्तधन काढू असे ठरले. पूजेसाठी सुशिक्षित मुलगी लागेल, मुलीची व्यवस्था मी करतो, त्यासाठी अजून पैसे लागतील, असे पठाणने सांगितले. दरम्यान, शुक्रवारी पूजेची तयारी सुरू असतानाच ‘अंनिस’ व पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला.

मूर्ती काढल्याने सुटला मोह
मांत्रिकाने गुरुवारी मूर्ती काढल्यानंतर ती सोन्याची असल्याचे सांगितले. त्यामुळे जाधव कुटुंबीयालाही येथे गुप्तधन मिळेल, याचा मोह सुटला. त्यांनी पुढील पूजा करण्यास व गुप्तधन काढण्यास संमती दिली.

तिघांना पोलिस कोठडी
वडोदबाजार : गुप्तधन काढून देणारा मांत्रिक बाळू शिंदे, त्याला सहकार्य करणारा इमामखाँ हसनखाँ पठाण, आमिषाला बळी पडलेला घरमालक दिगंबर कडूबा जाधव या तिघांना फुलंब्री न्यायालयाने दोन दिवस (सोमवारपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली. 

वडोदबाजार पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा फौजदार विजय जाधव यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ व अंधश्रद्धा निर्मूलन कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com