'आयुष'मुळे अडल्या आठ हजार जागा

योगेश पायघन
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - केंद्रीय आयुष मंत्रालयाने 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी मार्च ते जूनदरम्यान आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी या विद्याशाखांच्या राज्यातील महाविद्यालयांची पाहणी केली; पण अद्याप मान्यता दिलेल्या नाहीत. त्याअभावी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने महाविद्यालयांचे संलग्नीकरण थांबवून ठेवले. परिणामी, प्रवेशप्रक्रिया सुरू न झाल्याने राज्यातील या तिन्ही शाखांच्या महाविद्यालयांतील आठ हजार जागा अडल्या आहेत.

महाविद्यालयांना "आयुष'ने त्रुटी कळविल्या. त्या दूर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालवधी असतो. शिवाय न्यायालयानेही सहा महिन्यांचा कालावधी देण्याचे सांगितले आहे. यातील बहुतांश महाविद्यालयांच्या काहीच त्रुटी नाहीत. आयुर्वेदाच्या 25 शासकीयसह खासगी महाविद्यालयांना पाच वर्षांची मान्यता आहे, तर काहींची पाहणीच झालेली नाही. तरीही आयुष मंत्रालयातून सर्वच महाविद्यालयांच्या मान्यतांबाबत निर्णय होत नसल्याने त्या मान्यता येईपर्यंत राज्याच्या सीईटी सेलने वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू केलेली नाही.

आतापर्यंत एमबीबीएस आणि डेंटलसोबत सुमोटो प्रवेशप्रक्रिया राबविली जात होती. यावर्षी या दोन्ही शाखांची प्रवेशप्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली तरी आयुषअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थी नाइलाजाने गुजरात, कर्नाटकमध्ये प्रवेश घेत आहेत. अभिमत विद्यापीठांच्या जागा पूर्ण भरल्या जाव्यात, यासाठी हा विलंब होत असल्याचेही बोलले जात आहे.

विद्यार्थी कात्रीत
विद्यार्थ्यांनी दोन वर्षे अभ्यास करून परीक्षेचे दिव्य पार केले. त्यानंतर निकाल लागला. त्यालाही दोन महिने उलटले तरी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी कात्रीत सापडले आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून या विद्यार्थ्यांनी ऍग्रिकल्चर व टेक्‍नॉलॉजीच्या विषयात प्रवेश याद्यांत स्थान मिळविले; मात्र वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असल्याने ते प्रवेश नक्की करता येत नाहीत, तर वैद्यकीयचे प्रवेशही सुरू न झाल्याने या विद्याशाखांच्या जागा अडल्या आहेत.

ऑप्शन फॉर्म का भरून घेतले?
तेरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले. "आयुष'च्या मान्यतेअभावी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्यांचे संलग्नीकरण थांबवून ठेवले आहे. मान्यता व संलग्नीकरण थांबवायचे होते, तर आयुषअंतर्गतच्या विद्याशाखांचे ऑप्शन फॉर्म भरतानाच का थांबविले नाही? त्या महाविद्यालयांना ऑप्शनमध्ये का ठेवले, असा प्रश्‍न विद्यार्थी करीत आहेत.

मेडिकल आणि डेंटलची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ती या महिनाअखेर पूर्ण होईल. एक सप्टेंबरपासून बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएसच्या प्रवेशाला सुरवात होईल.
- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई.

Web Title: Education College Permission Aayush Mantralaya