गुरूंकडून शिष्यांसाठी मास्कअस्त्र; हा व्हिडिओ पाहाच

file photo
file photo

परभणी : कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल याची अद्याप शाश्वती नसली तरी येथील शिक्षण विभागाने पूर्वतयारी जोरात सुरू केली आहे. शाळा सुरू होण्याचे आदेश कधीही धडकू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा दप्तरासोबत मास्क अनिवार्य राहणार असल्याने त्यांना मास्क उपलब्ध व्हावेत यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी स्वत: स्काऊट गाईडच्या गणवेशात मास्क निर्मितीला सुरवात करत जिल्ह्यातील शिक्षकांना मास्क तयार करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे २०१९-२० मधील शैक्षणिक वर्ष मार्च महिन्यातच आटोपते घ्यावे लागले. आता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे. राज्याच्या शिक्षण विभागात वरिष्ठ पातळीवर समनव्य नसल्याने शाळा कधी सुरू करायच्या, याचा निर्णय आद्याप झाला नाही. शाळा सुरू करण्यावरून अनेक मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे शाळा सुरू कधी होतील याची निश्चित माहिती समोर येत नसली तरी परभणी जिल्ह्यात ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे.

विविध उपक्रम हाती घेतले
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या पुढाकारातून एप्रिल महिन्यापासून ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. तसेच सराव परीक्षादेखील पार पडल्या आहेत. सध्या शाळा सुरू नसल्या तरी, विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ऑनलाइनसोबतच ग्रामीण भागात सुशिक्षित युवकांनी आपल्या जवळच्या भागातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन शैक्षणिक योगदान देण्याचे आवाहन डॉ. पाटेकर यांनी केले आहे. 

शिक्षकांना मास्क अनिवार्य

शाळा कधीही सुरू झाल्यास विद्यार्थी, शिक्षकांना मास्क अनिवार्य राहणार असल्याने ऐनवेळी मास्कचा तुटवडा पडू नये तसेच नाहक अगाऊ पैसे जाऊ नयेत यासाठी तयारी म्हणून शिक्षण विभागाने शिक्षक, विद्यार्थ्यांना घरीच मास्क तयार करण्याचे आवाहन केले आहे. त्याची सुरवात स्वत: डॉ. पाटेकर यांनी केली आहे. 

३०० हून अधिक मास्क तयार
भारत स्काऊट गाईडच्या त्या उपाध्यक्षा असून स्काऊटमध्ये स्वावलंबी होण्याबाबत विद्यार्थ्यांना धडे दिले जातात. त्याचा एक भाग म्हणून डॉ. पाटेकर यांनी स्काटऊच्या गणवेशात घरीच मास्क निर्मितीला सुरवात केली आहे. दैनंदिन कामातून वेळ काढत त्या दररोज घरीच मास्क शिवणकाम करत आहेत. आतापर्यंत ३०० हून अधिक मास्क तयार केले असून हे मास्क जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.

शिक्षकांना मास्क तयार करण्याचे आवाहन
दोन लाखांहून अधिक विद्यार्थी संख्या असल्याने एका विद्यार्थ्याला किमान दोन मास्क विद्यार्थ्यांना लागणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने मास्कची भासणारी गरज ओळखून डॉ. पाटेकर यांनी जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक असलेल्या सर्व शिक्षकांना मास्क तयार करण्याचे आवाहन केले. प्रत्येक शाळातील शिक्षकांनी मास्क तयार करून विद्यार्थ्यासाठी तयार ठेवावेत, जेणेकरून ऐनवेळी मास्कचा तुटवडा पडणार नाही आणि विद्यार्थ्यांची मास्कअभावी शाळा बुडणार नाही. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काही शिक्षकांनी मास्क निर्मितीला सुरवात केली आहे.
डॉ. पाटेकर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अधिकारी स्वत: मास्क तयार करू लागल्याने शिक्षकांनीदेखील त्यांचे अनुकरण करण्यास सुरवात केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क देणार 
शाळा सुरू होण्याचे संकेत मिळत असले तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु, सज्जता म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना मास्क देणार आहोत. त्यासाठी मास्क तयार करण्याचे  शिक्षकांना आवाहन केले आहे.
डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com