ईद-ए-मिलादुन्नबी’ निमित्त समाजाप्रती जाेपासली बांधिलकी

photo
photo

कळमनुरीः प्रत्येक धर्मातील सणाचे एक आगळेवेगळे महत्व असते. त्या सणाला साजरे करताना केवळ आपल्यापुरता किंवा आपल्या कुटुंबाचा विचार न करता समाजाचेही आपण काही देणे लागताे, याचा प्रत्यय हिंगाेली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ईद-ए-मिलादुन्नबी साजरी करताना आल्याचे पहावयास मिळते.

नुरी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मागील तीन वर्षापासून एक वेगळा पायंडा पाडत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयाेजन यशस्विरित्या केले आहे. रविवारी (ता.१०) मुस्लिम समाजातील पाच उपवर वधूवरांचा विवाह यानिमित्ताने लावण्यात आल्याने याची सर्वत्र चर्चा हाेत आहे.  


शहरातील नुरी वेल्फेअर सोसायटी सदस्यांनी समाजातील नागरिकांच्या सहकाऱ्याने रविवारी (ता.१०) पाच जोडप्यांचा विवाह लावून मागील तीन वर्षांपासून समाजातील उपवर वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याची परंपरा जोपासत मुस्लिम समाजात वेगळा पायंडा पाडला आहे.


मुस्लिम समाजामध्ये विवाह समारंभासाठी येणारा खर्च पाहता सर्वसामान्य उपवर वधू-वरांच्या पित्याला पेलवणारा नाही हे पाहून समाजामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू करण्याकरिता समाजामधील काही नागरिकांनी एकत्र येत नुरी वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली. यामध्ये हाजी अब्दुल्ला अश्रफी, हाजी अब्दुल गणी बागवान, ॲड इलियास नाईक, अजीज पठाण, शेख मतीन, मुस्तफा बेग यांचा समावेश आहे. समितीमधील पदाधिकारी व सदस्यांनी एकत्रित समाजामधील नागरिकांसोबत यासंदर्भात चर्चा करून सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मुहूर्तमेढ रोवली व ईद मिलादुन्नबीच्या दिवशी विवाह सोहळा घेण्याचे निश्चित करण्यात आले.


त्यानुसार पहिला सामूहिक विवाह सोहळा २०१७ ला ईदच्या दिवशी घेण्यात आला. मुस्लिम समाजामधील पहिल्याच सामूहिक विवाह सोहळ्याला नागरिकांनी केलेली मदत व मिळालेला प्रतिसाद पाहता नुरी वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी दरवर्षी ईदच्या दिवशी समाजामधील उपवर वधू-वरांचा सामूहिक विवाह मेळावा घेण्याचा संकल्प केला. त्यानुसार सलग तिसऱ्या वर्षी या सोसायटीतर्फे रविवारी ईद मिलादुन्नबी दिनाचे औचित्य साधून शहरामधील सर्व प्रार्थना स्थळांच्या धर्मगुरुंच्या उपस्थितीत रजा मैदान येथे पाच उपवर वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा लावून वधूवरांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.

नुरी वेल्फेअरचा उपक्रम
सलग तिसऱ्या वर्षी मुस्लिम समाजामध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून नुरी वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मुस्लिम समाजात सामूहिक विवाह सोहळ्याचा पायंडा पाडला आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com