महापालिका स्थायी समितीवर आठ नवीन सदस्यांची नियुक्ती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

औरंगाबाद - महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्‍ती करण्यात आली. मावळते स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांची पुन्हा सदस्यपदी निवड झाली आहे.

औरंगाबाद - महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्‍ती करण्यात आली. मावळते स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांची पुन्हा सदस्यपदी निवड झाली आहे.

स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. दोन वर्षे झाल्याने शहर विकास आघाडीचे बारवाल, अपक्ष कीर्ती शिंदे, शिवसेनेचे सीताराम सुरे, भाजपचे राजगौरव वानखेडे, मनीषा मुंडे, काँग्रेसचे शेख सोहेल, एमआयएमचे अजीम व संगीता वाघुले निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्‍त जागांवर नवीन सदस्यांची नियुक्‍ती करण्यासाठी गुरुवारी (ता. २६) महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक गटाच्या गटनेत्यांनी त्यांच्या ठरलेल्या सदस्यसंख्येच्या कोट्यानुसार नावांची शिफारस करून बंद पाकिटात पीठासन अधिकारी महापौरांकडे देणे अपेक्षित असते; मात्र त्यात मावळते सभापती बारवाल हे सभागृहात आले नाहीत, त्यांनी दुसऱ्यांच्या हाती पाकीट पाठवून दिले. त्यात स्वतःच्या नावासह सत्यभामा शिंदे यांच्या नावाची शिफारस केली होती. महापौरांनी त्या दोन नावांची घोषणा केली. यावर राजू शिंदे यांनी आक्षेप घेऊन गटनेत्यांनी सभागृहात उपस्थित राहून सदस्यांच्या नावांची शिफारस असलेले पाकीट पीठासन अधिकाऱ्यांकडे द्यायला पाहिजे, असे असतानाही हे पाकीट फोडून त्यातील नावे जाहीर करणे नियमबाह्य असल्याचे नमूद केले. मात्र पीठासन अधिकारी महापौर घोडेले यांनी आता नावे जाहीर झाली असल्याचे सांगून अन्य पक्षांच्या गटनेत्यांनी शिफारस केलेल्या नावांची घोषणा केली. भाजपचे पूनमचंद बमणे, जयश्री कुलकर्णी, शिवसेनेतर्फे शिल्पाराणी वाडकर, संयुक्‍त लोकशाही आघाडीतर्फे अब्दुल नवीद अब्दुल रशीद, एमआयएमच्या सायराबानो अजमलखान व नसरीन बेगम समदयारखान यांची नियुक्‍ती करण्यात आली.

Web Title: Eight new members are appointed on the Standing Committee of Municipal Corporation