बीड जिल्ह्यात थरार, घरातून आठ धारदार शस्त्र व छऱ्याची गन जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

पालवण येथील मस्के वस्ती येथे राहत असलेल्या करण भीमसिंग टाक याने तो राहत असलेल्या राजू महासिंग टाक याच्या घरात शस्त्रसाठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. घराची झडती घेतली असता घरात चार धारदार तलवारी, दोन सुरे, एक रामपुरी चाकू व एक छऱ्याची गण असा शस्त्रसाठा आढळून आला.

बीड - एका घरात धारदार शस्त्र असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या पथकाने छापा टाकून आठ धारदार शस्त्र आणि एक छऱ्याची गन जप्त केली. ही कारवाई परिसरातील पालवण येथील मस्के वस्ती येथे करण्यात आली. 

पालवण येथील मस्के वस्ती येथे राहत असलेल्या करण भीमसिंग टाक याने तो राहत असलेल्या राजू महासिंग टाक याच्या घरात शस्त्रसाठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून या शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी पथकासह घराची शुक्रवारी (ता.२२)  झडती घेतली असता घरात चार धारदार तलवारी, दोन सुरे, एक रामपुरी चाकू व एक छऱ्याची गण असा शस्त्रसाठा आढळून आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईत श्री. राऊत यांच्यासह फौजदार गोविंद एकिलवाले, तुळशीराम जगताप, भारत केंद्रे, मुंजाबा कुव्हारे, विकास वाघमारे, नरेंद्र बांगर, जयश्री नरवडे, संजय जायभाये यांनी सहभाग घेतला. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

लॉकडाउनच्या संदर्भाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यात ३२८१ जणांविरोधात ९५२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये कोरोना विषाणूबद्दल अफवा आणि सामाजिक द्वेष पसरविण्यासह संचारबंदीचे उल्लंघन, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. तर या कालावधीत अवैध दारूविक्रीचेही ६८८ आरोपींविरुद्ध ५४५ गुन्हे नोंद करून त्यांच्याकडून ७३ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight sharp weapons and a shotgun were seized from the house