देवणीत आठ दुकाने फोडली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

देवणी  - येथील मुख्य बाजारपेठेतील आठ दुकाने फोडून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली आहे. रविवारी (ता. 25) मध्यरात्री झालेल्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

देवणी  - येथील मुख्य बाजारपेठेतील आठ दुकाने फोडून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली आहे. रविवारी (ता. 25) मध्यरात्री झालेल्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

रविवारी मध्यरात्री निलंगा-उदगीर राज्यमार्गावरील तीन दुकाने तर देवणीच्या मुख्य बाजारपेठेतील सहा दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून तर काही ठिकाणी बारच्या साह्याने शटर उचलून दुकानांची तोडफोड करीत आतील मौल्यवान वस्तू, दागिने, रोख रकमेचा ऐवज चोरण्यात आला असून यात दोन सराफा दुकानांचा समावेश आहे. निलंगा-उदगीर राज्यमार्गावरील बेलुरे यांच्या अक्षय स्टेशनरीमधील रोख रक्‍कम, रिचार्ज व्हाऊचर, कोर्ट स्टॅंप, रसीद तिकीट असा 55 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. अविनाश धनुरे यांच्या गणेश कलेक्‍शनमधील तीन लाख 86 हजार 300 रुपये चोरीला गेले आहेत. अक्षय ज्वेलर्समधील तीन किलो चांदी व तीन किलो मोड असा दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे. साईश्रद्धा ज्वेलर्समधील रोख व सोने-चांदी अशी 55 हजार रुपयांची चोरी झाली. कैलाश किराणा स्टोअर्समधून 3800 रुपये चोरट्यांनी लंपास केले. डिलक्‍स मोबाईल शॉपीतून बारा मोबाईल व 16 हजार रुपयांची रक्‍कम चोरून नेण्यात आली. श्रेयस ट्रेडिंग कंपनीचे 15 हजार रुपये, सुभाष किराणाचे दहा हजार रुपये चोरण्यात आले. एक गिफ्ट सेंटर व एका फर्निचर दुकानातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी श्वानपथकाला बोलावण्यात आले होते, मात्र बसस्थानक परिसरातून चोरटे बोरोळ चौकाकडे गेल्याचा सुगावा श्वानपथकाकडून लागला आहे. याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

चोरट्यांच्या तपासासाठी चार पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: eight shops robbery

टॅग्स