आठ मजुराच्या खांद्यावर जलशुद्धीकरण केंद्राची मदार

हरी तुगावकर 
गुरुवार, 17 मे 2018

गेल्या काही दिवसांपासून शहराला होणारा पाणी पुरवठा हा एक चर्चेचा विषय बनला आहे. या जलशुद्धीकरण केंद्रातून तुरटी तसेच ब्लिचिंग पावडरची मात्रा वाढवून जलशुद्धीकरण केले जात आहे. पण शहरात नळाला मात्र पिवळ्या रंगाचे पाणी येत आहे. महापालिकेत बसणाऱया अभियंत्यांना गेल्या काही दिवसांपासून या पिवळ्या पाण्याचे कोडे उकलता आलेले नाही.

लातूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हरंगूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात काम पाहण्यासाठी अभियंत्याचा वानवा आहे. केंद्रातील प्रयोगशाळा अनेक वर्षांपासून बंद आहे. पाण्यात टाकण्यात येणारी ब्लिचिंग पावडरसाठी तयार करण्यात
आलेली डोसिंग रुमही बंदच आहे. मागील काही वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्राची जबाबदारी या केंद्रात कामावर असलेल्या मजूराच्या खांद्यावर आहे. पाच लाख लोकांचे आरोग्य हे मजूर प्रामाणिकपणे सांभाळत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहराला होणारा पाणीपुरवठा हा एक चर्चेचा विषय बनला आहे. या जलशुद्धीकरण केंद्रातून तुरटी तसेच ब्लिचिंग पावडरची मात्रा वाढवून जलशुद्धीकरण केले जात आहे. पण शहरात नळाला मात्र पिवळ्या रंगाचे पाणी येत आहे. महापालिकेत बसणाऱया अभियंत्यांना गेल्या काही दिवसांपासून या पिवळ्या पाण्याचे कोडे उकलता आलेले नाही. तर पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी जलशुद्धीकरण केंद्र अद्यावत असणे आवश्यक आहे. पण हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्र मात्र मजुरांच्या हाती आहे.

या केंद्रात एकही कायमस्वरुपी अभियंता कार्यरत नाही. या केंद्रात एक प्रयोगशाळा आहे. पाण्याची चव, रंग, वास, गढुळता, टीडीएस, कठीणता, पी.एच, आयर्न, अॅल्युमिनिअम, नायट्रेट, सल्फेट, सल्फाईड, फ्लोराईड, क्लोराईड, अविशिष्ट क्लोरिन हे सर्व तपासण्यासाठी एक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. ती गेली अनेक वर्षांपासून बंदच आहे. सध्या महापालिका जिल्हा प्रयोगशाळेकडून पाण्याची तपासणी करून घेत आहे.

येथील प्रयोगशाळेतील साहित्य मात्र तसेच पडून आहे. या केंद्रात स्वतंत्र डोसिंग रुम आहे. येथून स्वंयचलित यंत्रणेद्वारे ब्लिचिंग
पावडर, तुरटी पाण्यात सोडण्याची व्यवस्था आहे. ही यंत्रणा देखील अनेक वर्षांपासून बंद आहे. जलशुद्धीकरणाच्या ठिकाणीच ब्लिचिंग पावडर व तुरटी टाकली जात आहे. रंग बदलला तर अधिकारी फोनवरून मजुरांना आदेश देतात. त्यानुसार मजूरया केंद्रात ब्लिचिंग पावडरची मात्रा वाढवतात. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरु आहे.

सध्या पिवळे पाणी कशामुळे येत आहे, याचा शोध महापालिकेच्या अभियंत्याला अद्यापपर्यंत लागलेला नाही. या सर्व प्रकाराकडे नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी लक्ष देण्यास सुरवात केली आहे. हे प्रकरण त्यांनी आता आपल्या हातावर घेतले असून संबंधिताला कामाला लावले आहे.
 

Web Title: the eight worker have controlling water purification work