Police News | अठरा पोलिस कर्मचाऱ्यांचे रोखले वेतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

अठरा पोलिस कर्मचाऱ्यांचे रोखले वेतन

जालना : अनेक वेळा सोयीचे पोलिस ठाण्यांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांचा अट्टहास असतो. त्यात पसंतीचे पोलिस ठाणे मिळाले तर ठिक नाही तर बदलीचे आदेश आले तरी प्रभारी अधिकाऱ्याला हाताशी धरून अनेक जण आहे त्याच ठिकणी ठाण मांडून बसतात. शिवाय अनेक जण वैद्यकीय कारण देवून गायबही होतात. ही बाब लक्षात येताच पोलिस अधीक्षकांनी दणका देत अठरा कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: Union Budget 2022 : निर्मला सीतारामन यांची अशी झाली एंट्री

पोलिस दलातील प्रमुख पोलिस ठाण्यांसह विशेष शाखांमध्ये बदली मिळविण्यासाठी अनेक पोलिस कर्मचारी प्रयत्नशील असतात. मात्र, सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना यात यश मिळते असेही नाही. त्यामुळे अनेक जण सोयीच्या पोलिस ठाण्यात बदल्या करून घेण्यावर भर देतात. त्यातूनही आडमार्गाच्या पोलिस ठाण्यात बदली झाली तर अनेक जण प्रभारी अधिकाऱ्याला हाताशी धरून बदल्यानंतर ही वर्षानुवर्ष एका ठिकाणी ठाण मांडून बसतात. अशाच बदली होऊन वर्ष लोटल्यानंतर ही बदलीच्या ठिकाणी हजर न झालेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्यांचे वेतन रोखण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.

हेही वाचा: राज्यात कोव्हॅक्सिनचा तुटवडा

यात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलिस कर्मचारी, कदीम जालना, तालुका जालना व भोकरदन या पोलिस ठाण्याचा प्रत्येकी एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर वैद्यकीय कारण देऊन गायब झालेल्या दहा पोलिस कर्मचाऱ्यांचे ही जानेवारी महिन्यांचे वेतन रोखण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवाय गैरहजर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह एका सहायक फौजदाराचे जानेवारी महिन्यांचे वेतन रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनात कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

कागदावर कार्यमुक्त, पण ठाण मांडून ?

काही ठिकाणी प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांनी बदली झाल्यानंतर कागदावर कार्यमुक्त केल्याचे पोलिस कर्मचाऱ्याला दाखविले आहे. मात्र, ते आहे त्याच ठिकाणी ठाण मांडून असल्याची चर्चा पोलिस प्रशासनात सुरू आहे.

बंदोबस्त कामी आले, कायम झाले ?

पोलिस अधीक्षकांकडून अनेकदा बंदोबस्त कामी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बदल्या केल्या जातात. मात्र, बंदोबस्तांचे कारण संपल्यानंतर अनेक जण प्रभारी पोलिस अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच ठिकाणी ठाण मांडून बसतात. याकडे वरिष्ठ अधिकारी ही लक्ष देत नाही, हे विशेष.

हेही वाचा: Union Budget 2022 : निवडणुका असलेल्या पाच राज्यांना काय मिळणार?

अनेक पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर ही पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी त्यांना कार्यमुक्त करत नाहीत. त्यामुळे बदलीच्या आदेशाला काहीच किंमत राहत नाही. आदेश धुडकावत पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचे लाड करणाऱ्या पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

ते कंट्रोलचे आदेश कागदावर राहिले

सदर बाजार पोलिस ठाण्याच्या एका पोलिस उपनिरीक्षकांची बदली पोलिस अधीक्षकांनी पोलिस नियंत्रण कक्ष येथे केली होती. मात्र, त्यानंतर संबंधित अधिकारी सदर बाजार पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहे. विशेष म्हणजे या पोलिस उपनिरीक्षकाची मे व डिसेंबर महिन्यात म्हणजे दोन वेळा पोलिस नियंत्रण कक्षात बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, तरीही परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वचक कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Eighteen Police Personnel Withheld Salary Even After The Transfer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top