निवडणूक विभागाचे अजब नियम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

उस्मानाबाद - तालुक्‍यातील उमेदवारांना प्रचारासाठी वाहन वापरणे डोकेदुखी ठरत आहे. उस्मानाबाद तालुक्‍यासाठी एक नियम अन्‌ अन्य तालुक्‍यांत दुसरा नियम लागू केल्याने वाहन परवाना घेणे हा चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे परवान्यासाठी तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागत असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. 

उस्मानाबाद - तालुक्‍यातील उमेदवारांना प्रचारासाठी वाहन वापरणे डोकेदुखी ठरत आहे. उस्मानाबाद तालुक्‍यासाठी एक नियम अन्‌ अन्य तालुक्‍यांत दुसरा नियम लागू केल्याने वाहन परवाना घेणे हा चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे परवान्यासाठी तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागत असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. 

उस्मानाबाद तालुक्‍याच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी वाहन वापरण्याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनाचा फिटनेस आहे की नाही, वाहन चालविण्यास योग्य आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पाठविली जात आहेत. त्यामुळे या कार्यालयात वाहनांची गर्दी होत आहे. त्यातच तपासणी फीस म्हणून दोन हजार रुपये घेतले जात आहेत. वाहनासोबत मालकाचे चार फोटोही जोडावे लागत आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार सोमवारी (ता. सहा) आरटीओ कार्यालयात ताटकळत थांबल्याचे दिसून आले. दरम्यान हाच नियम उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांत नाही. संबंधित तालुक्‍याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र या नियमाला छेद दिला आहे. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात वाहनाचे आर. सी. बुक झेरॉक्‍स, वाहनचालकाचा परवाना, तसेच वाहनमालकाचे नाहरकत जोडून अर्ज केल्यानंतर तत्काळ वाहनास प्रचाराची परवानगी दिली जाते. जिल्ह्यातील निवडणूक विभागाच्या अजब नियमांमुळे गोंधळाची स्थिती आहे. प्रत्येक अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे नियम लागू करीत असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. 

वाहनाची तपासणी करणे हा नियम आहे. त्यामुळे आम्ही वाहने तपासणीसाठी आरटीओ कार्यालयाकडे पाठवीत आहोत. 
- अरविंद लाटकर, निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद तालुका 

आर.सी.बुकची झेरॉक्‍स, वाहन चालकाचा परवाना, वाहन मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडल्यानंतर आम्ही परवाना देतो. आरटीओ कार्यालयात पाठविण्याची गरज नाही. 
- अरविंद बोळंगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उमरगा. 

प्रत्येक अधिकारी स्वतःच्या मर्जीप्रमाणे नियम लागू करीत आहे. यापूर्वी, तसेच सध्याही अन्य तालुक्‍यात लागू नसलेले नियम सांगून केवळ उस्मानाबाद तालुक्‍यातील उमेदवारांना नाहक त्रास दिला जात आहे. हा प्रकार म्हणजे उमेदवारांची लूट आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य निर्णय घेतला पाहिजे. 
- संजय खडके, वाघोली गणातील उमेदवार.

Web Title: Election department rule