‘या’ दिवशी होणार महापौर-उपमहापौरपदासाठी निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

परभणी : परभणी शहर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवारी (ता.२२) रोजी महापौर-उपमहापौर निवडले जाणार आहेत तर अर्ज देणे व स्विकारण्याची प्रक्रीया रविवार (ता.१७) व सोमवार (ता.१८) सुरु राहणार आहे. 

परभणी : परभणी शहर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवारी (ता.२२) रोजी महापौर-उपमहापौर निवडले जाणार आहेत तर अर्ज देणे व स्विकारण्याची प्रक्रीया रविवार (ता.१७) व सोमवार (ता.१८) सुरु राहणार आहे. 

परभणी शहर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ता. २२ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्याच दिवशी दुसऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी महापौर-उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी बी. रघुनाथ सभागृहात सकाळी ११ वाजता त्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर काम पाहणार आहेत. 

महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात रविवारी (ता.१७) व सोमवारी (ता.१८) सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज वितरीत केले जाणार आहेत तर या दोनही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी शुक्रवारी (ता.२२) विशेष सभा सुरु झाल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. लगेचच वैध उमेदवारांची नावे घोषीत केल्या जाणार असून त्यानंतर उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी १५ मिनीटांचा वेळ दिल्या जाणार आहे.  मतदान घेणे आवश्यक असल्यास पिठासीन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषीत करतील व हात वर करून मतांची नोंद घेतली जाणार आहे. सुरुवातीला महापौर व त्यानंतर उपमहापौर पदाची निवड होणार आहे. 

इच्छुक उमेदवार, पालिका सदस्यांना विशेष सूचना
महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरतांना जात वैधता प्रमाणपत्र व ओळखपत्राची सत्यप्रत नगरसचिव कार्यालयात दाखल करावी लागणार आहे. एका उमेदवारास चार पेक्षा अधिक अर्ज दाखल करता येणार नाहीत. कोणत्याही पालिका सदस्यास एका पेक्षा अधिक उमेदवारांचे सूचक किंवा अनुमोदक होता येणार नाही. तसेच विशेष सभेत प्रवेशासाठी ओळख पटेल असे शासकीय ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. 

पिठासीन अधिकारीपदी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शुक्रवारी (ता.१५) महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीची प्रक्रीया घेण्याचे व त्यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केल्याचे आदेश महापालिकेला मिळाले. त्यानंतर लगोलग प्रभारी नगर सचिव विकास रत्नपारखे यांच्या स्वाक्षरीने निवडणूकीची अधिसूचना काढण्यात आली. तसेच शुक्रवारी रात्रीच सर्व पालिका सदस्यांना देखील ती पाठवण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election for mayor-deputy mayor on this day