तनिष्का उमेदवारांच्या प्रचारास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद जिल्ह्यात १५ व १६ ऑक्‍टोबरला होणार मतदान, महिलांत मोठा उत्साह, भेटीगाठी सुरू

औरंगाबाद - तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान व्यासपीठातर्फे औरंगाबाद जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरवात झाली आहे. निवडणुकीसाठी तनिष्का उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्या घरोघरी जाऊन महिला मतदारांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत. १५ व १६ ऑक्‍टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी तनिष्का सदस्या सज्ज झाल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात १५ व १६ ऑक्‍टोबरला होणार मतदान, महिलांत मोठा उत्साह, भेटीगाठी सुरू

औरंगाबाद - तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान व्यासपीठातर्फे औरंगाबाद जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरवात झाली आहे. निवडणुकीसाठी तनिष्का उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्या घरोघरी जाऊन महिला मतदारांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत. १५ व १६ ऑक्‍टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी तनिष्का सदस्या सज्ज झाल्या आहेत.

गोदावरीत जलपूजन करून भरले अर्ज
कायगाव - तनिष्का व्यासपीठाअंतर्गत होणाऱ्या निवडणुकीसाठी कायगाव (ता. गंगापूर) येथील तनिष्का महिलांनी येथील गोदावरी नदीकाठच्या ऐतिहासिक रामेश्वर मंदिरचे दर्शन घेऊन व गोदावरीत जलपूजन करून उमेदवारी अर्ज भरले. तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून कायगावात विकासकामे राबविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. 

तनिष्का सदस्या मीनाक्षी सोमनाथ गायकवाड, डॉ. वैशाली कृष्णा जाधव, निर्मला लक्ष्मण डहाले, उषा विजय नजन यांनी रामेश्‍वर शिवालयाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. निवडणूक अधिकारी तथा तलाठी सतीश क्षीरसागर यांनी तनिष्का महिलांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला. डॉ. कृष्णा जाधव, विजय नजन, कायगाव सेवा संस्थेचे संचालक सोमनाथ गायकवाड उपस्थित होते. नवीन कायगावच्या जिल्हा परिषद शाळेत रविवारी (ता. १६) मतदान होणार आहे. श्री. क्षीरसागर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी संजय चौथे, मुख्याध्यापिका सुनीता अकोलकर निवडणुकीचे काम पाहणार आहेत. तनिष्का उमेदवारांनी गावातील मतदार महिलांच्या भेटी घेण्यास सुरवात केली आहे.

पैठणला दोन उमेदवारांचे अर्ज

पैठण - शहरातील नवीन कावसन भागातील दत्त मंदिरात दर्शन करून वर्षा खेडकर व सुमनबाई गुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा ताराई महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गणेश शिंदे यांनी अर्ज स्वीकारले. तत्पूर्वी खेडकर व गुळे यांनी महिला मतदारांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या व तनिष्का व्यासपीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. 

शनिवारी (ता. १५) मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना कुसुमबाई लबडे, मुक्ताबाई चव्हाण, बेबीताई वाघमारे, अलका पिसे, कौशल्या शिसोदे, मंगलबाई गवारे, गिरिजा पठाडे, शशिकला वाघमारे, द्वारकाबाई जाधव, सुनीता अकोलकर, पार्वताबाई केदार, सीमा नागरे, मनीषा शिरसाठ उपस्थित होत्या.

पालखेडला पाच सदस्यांनी भरले अर्ज
पालखेड - पालखेड (ता. वैजापूर) येथे तनिष्का व्यासपीठाच्या पाच सदस्यांनी गावातील पारेश्वर महादेव मंदिरात उमेदवारी अर्ज दाखल करून भगवान पारेश्वराचे दर्शन घेतले. 

प्रथमच निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला. तनिष्का व्यासपीठाच्या उपक्रमाद्वारे ‘सकाळ’ने महिलांचा आत्मविश्वास उंचावून हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे तनिष्का सदस्या स्वाती गणेश भाडाईत यांनी सांगितले. पाच सदस्यांनी अर्ज दाखल केले असून, शनिवारी (ता. १५) मतदान होणार आहे. 

अलकाबाई अशोक भाडाईत, संगीता बाबासाहेब मोकाटे, स्वाती भाडाईत, मोनाली रामहरी पोखरे व सुनीता रमेश बुबणे यांनी अर्ज दाखल केले. पंचायत समिती सदस्या चंद्रकला शेळके व ज्योती पुंडलिक सुराशे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री पारेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक ई. बी. वाघ यांच्यासह बी. टी. गाढे काम पाहणार आहेत.

महालकिन्होळ्यात रविवारी निवडणूक
वडोद बाजार - महालकिन्होळा (फर्शी) (ता. फुलंब्री) येथील दोन तनिष्का सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरले. यासाठी रविवारी (ता. १६) निवडणूक होणार आहे. जिजाबाई पांडुरंग शिंदे व शोभा मधुकर कापरे यांनी उमेदवारी अर्ज भरले. या वेळी सदस्या शोभा कैलास कापरे, तारा पांडुरंग तुपे, मीना सुदाम वाघ यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, फुलंब्री तालुकाध्यक्ष मधुकर कापरे, कैलास कापरे, पांडुरंग तुपे, सुदाम वाघ यांची उपस्थिति होती.

माळीवाड्यात तिघींनी भरले अर्ज

दौलताबाद - माळीवाडा (ता. औरंगाबाद) येथील दुर्गा महिला मंडळाच्या देवीसमोर संगीता मच्छिंद्र होले, कविता मनोज शिरसाठ, अनिता सुधाकर हेकडे यांनी निवडणूक अधिकारी कैलास गायके यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. माजी सरपंच बाबाजी मुळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब हेकडे, मनोज शिरसाठ, विशाल गाजरे, योगेश दांगुर्डे, पोलिस पाटील प्रमोद साठे यांची उपस्थिती होती. रविवारी (ता. १६) जिल्हा परिषद शाळेत निवडणूक पार पडणार असून यासाठी तयारी झाली आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवार महिला प्रचाराच्या तयारीला लागल्या आहेत.

आळंद येथे दोन उमेदवारांत होणार लढत

आळंद - आळंद (ता. फुलंब्री) येथील मारुती मंदिरात तनिष्का व्यासपीठाच्या लीलाबाई सुरेश पायगव्हाण व सिंधुबाई रामदास चोपडे यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल केले. येथे रविवारी  (ता. १६) मतदान होणार आहे. निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी शशिकांत ठेंगे, ग्रामसेवक पुंडलिक मोठे, सरपंच मंगलाबाई खिल्लारे, भाग्यश्री सचिन तायडे, स्वच्छता समिती अध्यक्ष किरण पांडे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा वैष्णव, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कौतिक पायगव्हाण, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शिक्षक, रोजगार सेवक विठ्ठल दाढे, सचिन तायडे, बबन पायगव्हाण, अतुल तायडे, रवी पवार यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

Web Title: election publicity by tanishka candidate

टॅग्स