निवडणूक विशेष : "भेगाळल्या भूई परी जीणं" सरपंचपदानंतरच्या जीवनातील भयाण वास्तव

file photo
file photo

जिंतूर (जिल्हा परभणी) : सत्तेच्या नवलाईचे दिवस संपल्यानंतर आर्थीक विवंचना आणि प्रापंचिक आयुष्यात माजी सरपंचांच्या वाट्याला आलेले जगण्याचे भयाण वास्तव मनाला सुन्न करून सोडणारे आहे. सध्या ग्रामीण भागात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. गावगड्याचा कारभार हाती घेण्याची स्वप्ने पहात राजकारणाचा अनुभव असलेले, नसलेले हौसे, नवसे, गवसे असे सर्वच आपले राजकीय अस्तित्व जाणून घेण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याचे चित्र निवडणूक होत असलेल्या गावांमधून पहायला मिळत आहे.

वेगवेगळ्या राजकीय पक्षाची नेतेमंडळी ग्रामीण भागातील आपला प्रभाव कायम रहावा,शक्य झाल्यास त्यात वाढ करून जास्तीत पंचायती आपल्या पक्षाच्या ताब्यात आणण्यासाठी कधी उघड तर कधी छुपेपणाने प्रयत्न करतात.कारण पराभूत झाले तेही आपले आणि विजयी झाले तेसुध्दा आपलेच हा त्यांचा हेतू.त्यामुळे राजकारणाच्या माध्यमातून आपले भवितव्य घडविणाऱ्या नवतरुणाईला देखील सत्तेची भुरळ पडत आहे. परंतु सत्तेच्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यानंतर आर्थीक विवंचना आणि प्रापंचिक आयुष्यात माजी सरपंचांच्या वाट्याला आलेले जगण्याचे भयाण वास्तव मनाला सुन्न करून सोडणारे आहे. 

गत २०१५- २० च्या ग्रामपंचायतच्या निवडणूकीत जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील एकनाथ मस्के यांनी पक्षाच्या थोड्याफार आर्थीक मदतीव्यतिरिक्त मुलाबाळांच्या शिक्षण आणि लग्न खर्चासाठी जमवलेली पुंजी खर्च करुन निवडणूक लढवली. त्यात विजय मिळवून त्यांनी सरपंच भूषविले. निस्वार्थीपणे गावचा कारभार हाकला. आज 'सत्ता गेली शहाणपण गेलं' या उक्तीप्रमाणे सत्ता गेल्यावर आर्थिक कोंडीत सापडल्याने मस्के हे सद्यस्थितीत सहकुटुंब औरंगाबाद येथे वनरुम किचन भाड्याने घेऊन एका खाजगी कंपनीत सपत्नीक रोजंदारीवर काम करीत आहेत.

अशीच वेळ तालुक्यातील वरुड (न्रसिंह) येथील माजी सरपंच शेषराव माहूरे यांच्यावर आली. २००७- १२ या काळात सरपंचपदी ते निवडून आले होते. पद गेल्यानंतर ते परभणी जिल्ह्यातील कातनेश्वर येथे एका प्रगतशील शेतकऱ्याकडे आपल्या कुटुंबासह सालगडी म्हणून सतत सहा वर्षे शेतमजुरी करीत होते. परंतु यात कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने ते आता त्यांच्या मूळगावी वरुड येथे परत येऊन स्वतःच्या दोन एक्कर शेतात कष्ट करून राबत आहेत.

तालुक्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. स्वप्नातही राजकारणाचा विचार न केलेल्यांना सर्वसामान्यांना प्रस्थापितांच्या मर्जीनुसार राजकीय आखाड्यात उतरावे लागले व आरक्षणामुळे त्यांच्या आशिर्वादाने सरपंचपद भुषवावे लागले. ज्यांनी निवडणूकीसाठी हवा भरली ते मात्र आता विचारायला तयार नाहीत.
त्यामुळे राजकारणाला आपले करिअर समजून निवडणूक लढविणाऱ्या युवानेत्यांनी एकनाथ मस्के आणि शेषराव माहूरे यांच्या अनुभवातून धडा घेत, 'पुढच्याला ठेच मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे आपली आर्थीकमुळे घट्ट करूनच राजकारण करायला हरकत नाही.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com