Gram Panchayat Election : ११ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक स्थगित; केवळ सालेगावात आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elections of 11 Gram Panchayats postponed Voting today only in Saligao election commission politics

Gram Panchayat Election : ११ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक स्थगित; केवळ सालेगावात आज मतदान

कळमनुरी : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक विविध कारणांमुळे स्थगित करण्यात आली आहे. तर, केवळ सालेगाव येथे प्रभागांतर्गत रिक्त असलेल्या दोन जागांसाठी गुरुवारी (ता. १८) मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत काही प्रभाग व सरपंच पदाच्या रिक्त पदाकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये तालुक्यातील खापरखेडा, तरोडा, येगाव, रेनापूर, आसोला, नांदापूर, जामगव्हाण, सालेगाव येथील प्रभागांतील रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार होती.

कुंभारवाडीतर्फे कुर्तडी, बोल्डावाडी व ढोलक्याची वाडी येथील सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात येणार होती. पण, निवडणूक कार्यक्रमानुसार दिलेल्या मुदतीत खापरखेडा, तरोडा, येगाव, रेणापूर या ठिकाणच्या प्रभागांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तसेच असोला, नांदापूर, जामगव्हाण या ठिकाणी प्रभागातील एका जागेसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे या जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत.

तर, सरपंच पदासाठी असलेल्या कुंभारवाडीतर्फे कुर्तडी, बोल्डावाडी, ढोलक्याची वाडी या ठिकाणी सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असताना या ठिकाणी या आरक्षणांमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक ही रद्द झाली असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे केवळ सालेगाव येथील एका प्रभागातील दोन जागेसाठी गुरुवारी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. या ठिकाणी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.