ग्राहकास अचूक वीजबिलासह शंभर टक्के वसुलीच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

लातूर - महावितरणच्या ग्राहकांना अचूक वीजबिले द्यावीत व वीजबिलांची शंभर टक्के वसुली करावी, अशी सूचना महावितरणचे कार्यकारी संचालक शंकर शिंदे यांनी येथे केली.लातूर परिमंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  मुख्य अभियंता राजाराम बुरूड, अधीक्षक अभियंता सचिन तालेवार व  उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता प्रकाश पैनीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. शिंदे म्हणाले, की महावितरणच्या ग्राहकास अचूक वीजबिले देऊन शंभर टक्के वसुली करणे आवश्‍यक आहे. विजेची मागणी सर्वत्र वाढली आहे, ती  पूर्ण करत आहोत. मात्र विकलेल्या विजेचे पैसे शंभर टक्के वसूल होत नाहीत. आपण  बिलिंग एजन्सीवर पूर्णत: अवलंबून राहणे चुकीचे आहे. आपला कर्मचारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दरमहा ग्राहकांची मीटर रीडिंग क्रॉस चेक करुन वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. फॉल्टी मीटरची कसून तपासणी केली पाहिजे. केवळ मीटर बदलून चालणार नाही. त्या ठिकाणी बेकायदेशीर वीज वापर झाल्याची खात्री करुन पंचनाम्याशिवाय मीटर बदलू नका. घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक या वर्गवारीतील ग्राहकांचा एकूण वीज वापर लक्षात घेऊन त्या प्रमाणात वसुली होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून त्यानुसार वसुली करावी. जळालेले रोहित्राचे ऑईलचा हिशेब संबंधितांनी अचूक द्यावेत. मीटर रीडिंग एजन्सीला अचूक रीडिंग घेण्यासाठी सक्त ताकीद देण्यात आली. या सर्वच कामांत कसूर केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

परिमंडळाचे मुख्य अभियंता बुरुड यांनी कार्यकारी संचालक शिंदे यांचा सत्कार केला. लातूरचे अधीक्षक अभियंता तालेवार, उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता पैनीकर यांच्यासह उस्मानाबाद व लातूरचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: electricity bill

टॅग्स