गंगापूर वीस तास अंधारात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

गंगापूर - दोन दिवसांत शहर वीस तास अंधारात असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वीची दुरुस्ती केली नसल्याने महावितरणचे पितळ उघडे पडले आहे. याविषयी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा मोबाइल नॉट रीचेबल आला. शुक्रवारी (ता. २२) शहरात दिवसभर वीज नव्हती. त्यातच रात्री पाऊस झाल्याने पुन्हा वीज गायब झाली. 

शनिवारी (ता. २३) दुपारी पावसाला सुरवात झाली अन्‌ वीज पुन्हा गायब झाली. याविषयी शहरवासीयांनी सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, बेजबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात नागरिकांना वीज जाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, हे महावितरणने उन्हाळ्यात दिलेले आश्‍वासन नुसती वल्गनाच ठरली. 

मागील पंधरा दिवसांत शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे जवळपास अवघे शहर तीन वेळेला अंधारात बुडाले होते. शहरातील नागरिकांना तर आपण खरोखरच दुर्गम खेड्यात राहत असल्याचा अनुभव आला. येथे तब्बल वीस तास वीज गायब झाली होती. एकीकडे जोरदार पाऊस आणि दुसरीकडे अंधार असे चित्र होते. त्यात भरीस भर म्हणजे डासांमुळे अनेकांना रात्रभर झोप आली नाही. यामुळे नागरिक  प्रचंड त्रस्त झाले होते. त्यात महावितरणचे मदतीसाठीचे कोणतेही फोन उचलले जात नसल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले.

इन्व्हर्टरचा भार 
शहरात कुठलीच लोडशेडिंग नसल्याने इन्व्हर्टर घेण्याची गरज पडत नाही. परंतु, अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाला कंटाळून सर्वसामान्य जनतेला इन्व्हर्टर घेणे भाग पडत आहे.

विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने वीस तास वीज बंद होती. मुळात महावितरणने पावसाळ्यापूर्वी कोणतीच कामे केलेली नाहीत. पावसामुळे निर्माण झालेला उकाडा व त्यात वीज गायब झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लोकप्रतींनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरतील 
- अतुल कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्ते)

Web Title: electricity darkness