विजेच्या मागणीत विक्रम!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

औरंगाबाद - लाही लाही करून सोडणाऱ्या उष्णतेने राज्यातील जनात त्रस्त झाली आहे. ऊन आणि उकाड्यापासून जरासा दिलासा मिळावा, यासाठी नाना उपाय योजले जात आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ झाली आहे. राज्याची विजेची मागणी 20 हजार मेगावॉटच्या पुढे गेली आहे. यात मराठवाड्यात महिन्याकाठी अडीच हजार मेगावॉट लागणारी वीज साडेतीन हजार मेगावॉटच्या घरात गेली आहे. वाढलेल्या मागणीमुळे यंत्रणेवर चांगलाच ताण येत असल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

राज्याला दरवर्षी मार्च-एप्रिल मध्ये 18 हजार मेगावॉट वीज लागते; मात्र यावर्षी मार्चपासून तापमान 40च्या पुढे गेले होते. मेच्या तिसऱ्या आठवड्यात हे तापमान 46 ते 47च्या घरात गेले असल्यामुळे घरा-घरात एसी, कूलर, फॅन वापरणाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये राज्यात 18 हजार 500 मेगावॉट मागणी होती. ती एप्रिलमध्ये 19 हजार 300 आणि आता थेट 20 हजार मेगावॉटच्या घरात गेली आहे. ही वाढ विक्रमी आहे. मराठवाड्यात औरंगाबाद परिमंडळात औद्योगीकरणामुळे महिन्याकाठी 950 मेगावॉटच्या जवळपास वीज लागते. ही मागणी जवळपास 1200 मेगावॉटच्या घरात गेली आहे. नांदेडमध्ये 650 मेगावॉट, लातूर परिमंडळात 800 मेगावॉट वीज लागते. सध्या त्यात दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. औरंगाबाद परिमंडळात 1000 मेगावॉट, नांदेड 950 मेगावॉट, तर लातूर परिमंडळ 1000 मेगावॉट असे 3950 मेगावॉट वीज लागत असल्याची माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अतिरिक्त भार आणि मॉन्सूनपूर्व कामे आदींमुळे कर्मचारी व्यस्त आहेत. दरम्यान, वाढत्या मागणीमुळे काही भागांत अघोषित भारनियमनाचा फटकाही नागरिकांना सोसावा लागत आहे.

Web Title: electricity demand record