परळी येथील वीजनिर्मिती केंद्र सुरू

वीजनिर्मिती केंद्र
वीजनिर्मिती केंद्र

परळी वैजनाथ - जायकवाडी धरणातील पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आल्याने सोनपेठ तालुक्‍यातील खडका येथील बंधारा भरल्यामुळे गुरुवारपासून (ता. 22) येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात वीजनिर्मिती सुरू करण्यात आली आहे. 


येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक सात बुधवारी (ता. 21) सुरू करण्यात आला आहे. पाणीटंचाई व विजेची कमी असलेली मागणी या कारणामुळे आठ महिन्यांपासून हे वीजनिर्मिती केंद्र बंद होते. या केंद्रात 40 दिवस पुरेल एवढा कोळसाही उपलब्ध असल्याने सध्या तरी अडीच महिने वीज केंद्र सुरू राहणार आहे. येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात एकूण आठ संच असून संच क्रमांक एक, दोन व तीन हे कायमचे बंद करण्यात आले आहेत. उर्वरित संच क्रमांक चार व पाच हे वीजनिर्मिती करण्यास सक्षम असताना विजेची कमी असलेली मागणी व पाणीटंचाईमुळे दीड वर्षापासून बंद आहेत.

संच क्रमांक सहा, सात व आठमधून फेब्रुवारी 2019 पर्यंत वीजनिर्मिती सुरू होती; परंतु विजेची मागणी नसल्याने व औष्णिक वीजनिर्मिती केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी नदीवरील खडका बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यामुळे या संचातून होणारी वीजनिर्मिती थांबवावी लागली होती. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रासाठी चंद्रपूर व आंध्र प्रदेशातून कोळसा मागवण्यात येतो; परंतु सदरील कोळसा हा निकृष्ट दर्जाचा खरेदी केला जात असल्याने वीजनिर्मितीचे प्रमाणही कमी झाले आहे.

येथील वीजनिर्मिती केंद्रासाठी 500 किलोमीटर अंतरावरून कोळसा येत असून वाहतुकीचा खर्च इतर वीज केंद्रांच्या तुलनेने दुप्पट असल्यानेच परळीची वीज महाग आहे. यामुळे येथील केंद्रातील वीजनिर्मिती आठ महिन्यांपासून ठप्प झाली होती. 
नवीन परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक सहा, सात व आठपैकी संच क्रमांक सात सुरू करण्यात आला आहे. या संचातून गुरुवारपासून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. टप्प्याटप्याने संच क्रमांक सहा व आठ सुरू करण्यात येतील, असे येथील औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. शिंदे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com