७० किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांचा वीजभार झरीच्या पथ्यावर, फिडर ओव्हरलोडने वीज गुल..

अनिल जोशी
Thursday, 20 August 2020

एकाच फिडरवर संपूर्ण गावाचा लोड असल्यामुळे एका दिवसात अनेक वेळा लाईन जा-ये करत असल्यामुळे झरी परिसरात एक प्रकारचा विद्युत ग्राहकास सुविधा कमी, त्रास जास्त म्हणीप्रमाणे सुविधा मिळत आहेत. 

झरी ः एकाच फिडरवर संपूर्ण गावाचा लोड असल्यामुळे एका दिवसात अनेक वेळा लाईन जा-ये करत असल्यामुळे एक प्रकारचा विद्युत ग्राहकास सुविधा कमी, त्रास जास्त म्हणीप्रमाणे सुविधा मिळत आहेत. तालुक्यातील पेडगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रावरुन झरी या उपकेंद्रास विजेचा पुरवठा केला जातो. पेडगावच्या एकाच फिडरवर तब्बल ७० किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांचा वीजभार पडत असल्याने याकडे महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मात्र सर्वसामान्य वीज ग्राहकांना तासनतास अंधारात राहण्याची वेळ येत असल्याचा प्रकार पेडगाव व झरी केंद्रातंर्गत होत असल्याचे निदर्शनास आले. झरी उपकेंद्रावरुन टाकळी कुंभकर्ण, झरी, बोबडे टाकळी व जिंतूर तालुक्यातील दुधगाव या ठिकाणी वीजपुरवठा देवून तेथून इतर गावांना वीजपुरवठा केला जातो. तर पेडगाव उपकेंद्रावरुन जांब, कोल्हा येथे वीज देण्यात येते व तेथुन इतर गावांतील शेती व घरगुती वापरासाठी वीजपुरवठा करण्यात येतो.

पेडगाव उपकेंद्रावरुनच झरी ३३ केव्ही उप केंद्रास वीजपुरवठा करण्यात येत असल्याने या उपकेंद्रावरुन सध्या तब्बल ८४ गावांचा वीजेचा भार पडत आहे. झरी या गावात एक हजार २०० घरगुती तर एक हजार ५०० शेती ग्राहक आहेत. त्यांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी या उप केंद्रांतर्गत केवळ एक महिला व दोन पुरुष कर्मचारी नेमलेले आहेत. तसेच उप अभियंता व झरी येथील सहायक अभियंता या पदांचा कार्यभार ही प्रभारींवरच देण्यात आलेला असल्याने वीजग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.  

हेही वाचा - इसापूर धरणाचा पाणीसाठा 75 टक्क्याच्या पुढे पैनगंगा नदीला पूर- सावधानतेचा ईशारा

दुरुस्तीसाठी होतेय चालढकल
वीजपुरवठा जर एखाद्या फिडरवरुन काही तांत्रिक बाबीमुळे बिघाड झाल्यानंतर खंडीत झाला तर दोन ते तीन तास नेमका कुठे बिघाड झाला आहे, याचीच माहिती संबंधीत लाईनमन यांना समजत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. बिघाड समजली तर तीची दुरुस्ती पेडगाव किंवा झरी उप केंद्रांतर्गत असलेले लाईनमन येवून करतील असे एकमेकांवर कामे ढकलले जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

हेही वाचा - दारूवरून झाला वाद, पुढे काय झाले वाचा...

एबी स्विचचा अभाव
पेडगाव व झरी या दोन्ही उपवेंद्रावर गावांची संख्या जास्त आहे. पण वीजेच्या तांत्रिक बाबीतून बिघाड होण्याचेही तेवढेच प्रमाण वाढले आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे पेडगाव व झरी या दोन्ही उप केंद्रावर पुरवठा बंद करण्याकरिता एबी स्विचचा अभाव असल्याचे समजले आहे. हे स्विच तत्काळ उपलब्ध झाले तर एका फिडरवर बिघाड झाल्यास दुसऱ्या फिडरचा पुरवठा खंडीत होणार नाही हेही तेवढेच खरे आहे.

फिटर ओव्हरलोड
एकाच फिटरवर संपूर्ण गावाचा लोड असल्यामुळे एका दिवसात अनेक वेळा लाईन जा-ये करत असल्यामुळे एक प्रकारचा विद्युत ग्राहकास सुविधा कमी, त्रास जास्त म्हणीप्रमाणे सुविधा मिळत आहेत. 

आता जनता त्रस्त झाली
झरी वासियांचे गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळेस विनंती करूनही कुठलाही उपयोग होत नाही. त्यामुळे आता जनता त्रस्त झाली आहे. येत्या काही दिवसांत यात बदल न झाल्यास गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात येईल.
- गजानन देशमुख, झरी.

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity load of villages up to a distance of 70 km on the path of Zari, power outage due to feeder overload., Parbhani News