रवीच्या घरी आला नवप्रकाश..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

लातूर - थकीत वीजबिल न भरल्याने घरातील वीजपुरवठा कायमचा बंद पडला. मूळ बिलावर व्याज व दंड वाढतच गेला. मूळ थकबाकी भरल्यानंतर व्याज व दंड माफ करण्याची नवप्रकाश योजना महावितरणने सुरू केली. या योजनेचा लाभ घेत केवळ दोन हजार ३३० रुपये भरल्यानंतर श्‍यामनगर (बारा नंबर पाटी) येथील रवींद्र भिसे यांच्या घराचा वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला.

श्री. भिसे यांच्याप्रमाणे श्‍यामनगर (ता. लातूर) येथील ३८ जणांनी नवप्रकाश योजनेचा लाभ घेत थकबाकीमुळे घरातून कायमस्वरूपी गेलेल्या विजेला परत घरी आणले. योजनेला मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल या सर्व लाभार्थींचा महावितरणचे मुख्य अभियंता डी. डी. हामंद यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १५) सत्कार करण्यात आला.

श्री. भिसे हे रोजदांरीवर मजुरीला जातात. यात विजेचे बिल भरता आले नाही. थकबाकी वाढत गेली तसे त्यावरील दंड व व्याज वाढले. त्यामुळे वाढलेले बिल भरण्याची ताकदच उरली नाही. यामुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद झाला व घरात अंधार झाला.

चिमणीच्या उजेडात तब्बल दोन वर्षे काढली. महावितरणच्या नवप्रकाश योजनेची माहिती महावितरणचे जनमित्र सुधाकर घंटे व मेघराज डेंगे यांनी त्यांना दिली. दंड व व्याज माफीची सवलत घेत त्यांनी मूळ थकबाकी भरणा केली. त्यानंतर महावितरणने सभारंभपूर्वक त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. दोन वर्षांनंतर घरात आलेल्या प्रकाशामुळे श्री. भिसे यांचे कुटुंबीय आनंदी झाले. 

वीजपुरवठा दिल्यानंतर श्री. भिसे यांच्यासह ३८ ग्राहकांचा महावितरणच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी कार्यकारी अभियंता मदन सांगळे, उपकार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख, हरंगूळ शाखेचे सहायक अभियंता राहुल गाडे, सरपंच वनमाला वाकुरे, किरण वाकुरे, सदस्य संदीपान कोंडमगिरे, सुभद्रा चौगुले, विजया म्हस्के, सहायक अभियंता प्रवीण कोरे यांच्यासह महावितरणचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. भिसे यांच्याप्रमाणे अन्य ग्राहकांनीही नवप्रकाश योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. हामंद यांनी या वेळी केले.

Web Title: electricity navprakash scheme