चितेगावात वारंवार वीजपुरवठा खंडित

परमेश्वर काेकाटे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

चितेगाव (ता. पैठण) येथील लक्ष्मणभाऊनगर, लक्ष्मीनगर, कानिफनाथनगर, सादातनगर व औरंगाबाद-पैठण मुख्य रस्त्यांवरील काही बाजारपेठा येथील रोहित्रांत वारंवार बिघाड होत. त्यामुळे कॅनरा बॅंक व जिल्हा बॅंकेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून गणपती व गौरीपूजन या सारखे सण अंधारात साजरे करावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चितेगाव (जि.औरंगाबाद) : चितेगाव (ता. पैठण) येथील लक्ष्मणभाऊनगर, लक्ष्मीनगर, कानिफनाथनगर, सादातनगर व औरंगाबाद-पैठण मुख्य रस्त्यांवरील काही बाजारपेठा येथील रोहित्रांत वारंवार बिघाड होत. त्यामुळे कॅनरा बॅंक व जिल्हा बॅंकेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून गणपती व गौरीपूजन या सारखे सण अंधारात साजरे करावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

येथील लक्ष्मणभाऊनगर मधील रोहित्रात बुधवारी (ता. चार) रात्री अचानक बिघाड झाला आणि सर्वत्र अंधार पसरला. पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत रात्र ग्रामस्थांना अंधारात काढली. गुरुवारी (ता. पाच) रोहित्र थातूरमातूर दुरुस्ती करून काही काळ विद्युतपुरवठा सुरू करण्यात आला. पुन्हा रोहित्र जळाले. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील दोन बॅंकांचा व्यवहार काही काळ इन्व्हर्टरच्या साहाय्याने सुरू होता. त्यानंतर मात्र कॅनरा बॅंक व जिल्हा बॅंकेचा आर्थिक व्यवहार ठप्प झाला. कॅनरा बॅंक व्यवस्थापनाने दरवाजावर "लाईट नसल्यामुळे आज व्यवहार बंद आहे' असे वाक्‍य असलेले फलक लावले. याच भागात काही खासगी रुग्णाले असून रुग्णांना त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी सकाळी नवीन रोहित्र बसवून विद्युतपुरवठा सुरू करण्यात आला. पुन्हा काही तासांत काही भागांतील पुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे विद्युत उपकरणे बंद पडली.

शनिवारी (ता. सात) रात्री पुन्हा रोहित्र जळाल्यामुळे भागातील पूर्ण विद्युतपुरवठा खंडित झाला. बारा तासांत दुसऱ्यांदा रोहित्र जळाले. त्यामुळे हे रोहित्र पूर्वीच खराब होते की ते बसविण्यात निष्काळजीपणा झाला, याविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित्र कमी क्षमतेचे असेल तर जास्त क्षमतेचे टाकावे किंवा विद्युत ग्राहक कमी आणि विद्युत चोरी जास्त होत असेल तर त्यावर उपाय करावा. महावितरण कंपनीचे दुर्लक्ष पाच-सहा महिने झाले की रोहित्र जळते. त्यामुळे नाहक सणासुदीच्या दिवसांत ग्रामस्थांचे विजेअभावी हाल होत आहेत. रविवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तरी विद्युतपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

कॅनरा बॅंकेने लक्ष देण्याची गरज
परिसरात एकच राष्ट्रीयीकृत कॅनरा बॅंक असून या बॅंकेकडे दीर्घकाळ विद्युतपुरवठा खंडित झाला तर बॅंक सुरळीत चालेल अशी कुठलीही व्यवस्था नाही. आज या बॅंकेत परिसरातील दहा ते पंधरा गावांचे व परिसरातील कारखान्यांचे आर्थिक व्यवहार चालतात. चार तास विद्युतपुरवठा खंडित झाला तर आर्थिक व्यवहार बंद पडतो. आज मोबाईल मनोऱ्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला तर स्वतंत्र स्वयंचलीत जनरेटरची व्यवस्था आहे. सदरील बॅंक व्यवस्थापनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Supply Continue Disconnect In Chetegaon