वीज चोवीस तास की पाच तास? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

औरंगाबाद - चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला असला, तरी शहरातील कचराकोंडी पूर्णपणे सुटलेली नाही. त्यामुळे महापालिकेतर्फे आता वीज कंपनीवर खापर फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केवळ पाच तास वीज मिळत असल्याने कचरा प्रक्रियेची गती मंदावल्याचे सोमवारी (ता. 22) झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. दुसरीकडे महापालिकेला 24 तास वीज सुरू असल्याचा दावा वीज वितरण कंपनीने केला आहे. 

अनेक अडथळ्यांनंतर चार प्रकल्पांपैकी चिकलठाणा येथील एकमेव प्रकल्प सुरू करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. चोवीस तास हा प्रकल्प सुरू ठेवून कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. महिनाभरापूर्वी हा प्रकल्प सुरू झाला; मात्र शहर परिसरात कचऱ्याचे डोंगर वाढतच आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता. 22) घनकचरा व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी चिकलठाणा प्रकल्पाला केवळ पाच तास वीज मिळत असल्याने अडचणी येत असल्याचे कारण दिले. त्यावर कंपनीसोबत बोलून असल्याचे एक्‍स्प्रेस फिडरचे काम तातडीने पूर्ण करून कचरा प्रक्रियेची गती वाढवावी, अशा सूचना महापौरांनी केल्या. यासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जीटीएल वाहिनीवरून 24 तास वीजपुरवठा सुरू आहे, असे सांगितले. 

चिकलठाणा येथील महापालिकेच्या कचरा प्रकल्पाला जीटीएल या वाहिनीवरून 24 तास वीजपुरवठा सुरू आहे. त्यांना स्वतंत्र लाइन देण्यात आली आहे. प्रत्यक्ष पाहणी केली तर लगेच खरा प्रकार लक्षात येईल. यामुळे एक्‍स्प्रेस फिडरअभावी कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही, या दाव्यात काहीही तथ्य नाही. एक्‍स्प्रेस फिडरचे कामही अंतिम टप्यात आहे. 
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरण 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity twenty-four hours or five hours