अकरा तलाव तुडुंब, अकरा तलावांनी गाठली पन्नाशी    

अविनाश काळे
Friday, 25 September 2020

  • उमरगा-लोहारा तालुक्यातील परिस्थिती
  •  संभाव्य पाणीटंचाई दूर होण्यासाठी आणखी पावसाची आहे गरज.
  • सोयाबिन पिकाचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान

उमरगा (उस्मानाबाद) : गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे बऱ्याच तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली असून उमरगा-लोहारा  तालुक्यातील अकरा तलाव शंभर टक्के भरले आहेत. दरम्यान दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. मात्र उमरगा-लोहारा तालुक्यातील ४५ तलावापैकी अकरा तलाव भरले आहेत. तर अकरा तलावात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
तालुक्यातील शेती व्यवसायाचे गणित खरीप पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्यासाठी जुन महिन्यात पावसाची नियमितता महत्वाची ठरते. यंदा परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने जलसिंचनासाठी तलावात पाणी साठा उपलब्ध झाला. तरी अजूनही बहुतांश तलावात पन्नास टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. उमरगा-लोहारा तालुक्यातील ४५ प्रकल्पापैकी अकरा प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर अकरा प्रकल्पात पन्नास टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. ४५ प्रकल्पापैकी आलूर साठवण तलाव, अचलेर लघू पाटबंधारे तलाव, तुरोरी मध्यम प्रकल्प, कोळसूर लघू पाटंबधारे तलाव, डिग्गी साठवण तलाव, केसरजवळगा साठवण तलाव क्रमांक - दोन, तलमोडवाडी साठवण तलाव, वागदरी साठवण तलाव, भिकारसांगवी साठवण तलाव, दगडधानोरा साठवण तलाव, कोरेगाव लघू पाटबंधारे तलाव हे अकरा तलाव पूर्ण भरले आहेत. दरम्यान अजुन पावसाळ्याचे दिवस आणखी शिल्लक आहेत. ३० सप्टेंबर पर्यंत नैसर्गिकरित्या पावसाळा असतो. त्यानंतरही ३१ ऑक्टोबरपर्यंत अधून-मधून पाऊस होतो. त्यामुळे प्रशासनाकडून पाऊस मोजला जातो. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ७९९ मिलीमीटर आहे. सद्यस्थितीत पाचशे मिलीमीटर पाऊस झाला. अकरा तलाव भरलेले असले तरी उर्वरीत तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या तलावातील उपलब्ध पाणीसाठा पुढीलप्रमाणे : 

मुरळी (८८.५८), कदेर ( ३४.९६), दाळींब ( २२.४३), नारंगवाडी (९.३६), बेनितुरा मध्यम प्रकल्पात ( ६८.६३), गुंजोटी ( १२.७४), कसगी (४०.७६), एकुरगा (४२.६०), गुंजोटीवाडी ( ४२.००) कसमलवाडी (१.३५), कुन्हाळी (२.१३) काळलिंबाळा  (२३.४०) केसरजवळगा तलाव क्र. एक (५४.६६ ), कोरेगांववाडी ल. पा.(९१), सरोडी (जोता पातळीखाली), बलसूर तलाव क्र. एक (१६.९१) बलसुर तलाव क्र. दोन (७७.९२), कोराळ (१९.१२), सुपतगांव (७.०१), पेठसांगवी (५८.०४), आलुर ल. पा. (४२.०८), रामनगर (२२.७४), अचलेर (५०.००), धानुरी (६४.७२), लोहारा (७९.४९), बेलवाडी (६७.६४), भोसगा (६.२३), जेवळी साठवण तलाव क्र. एक (५.७५) जेवळी साठवण तलाव क्र. दोन (४१.६२), हिप्परगा रवा ल. पा. ( ६०.३८), हिप्परगा रवा साठवण तलाव  (२४.५२), टक्के इतका तलावात उपयुक्त पाणी साठा आहे.

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven lakes full, eleven lakes reached fifty Umarga news