बॅंकांमध्ये खडखडाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

औरंगाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रचंड गर्दी आणि करन्सी चेस्टच रिकामी झाल्याने बॅंका हतबल झाल्या आहेत. पगारदार वर्गाच्या खात्यात पैसे जमा झाले असले तरी बॅंकेतून मिळणाऱ्या कॅशअभावी बहुतांश जणांचे खिसे रिकामेच आहेत. बॅंकांकडील रोकड संपल्याने सोमवारी (ता. 5) बहुतांश बॅंका खातेदारांना फक्त दोन हजार रुपयांची कॅश देत होत्या. काही जणांनी 24 हजारांच्या रकमेसाठी बॅंकांमध्ये हुज्जतही घातली.

शहरातील सर्वच बॅंकांच्या करन्सी चेस्ट रिकाम्या झाल्या आहेत. पगार झाल्यानंतर शहराला किमान 700 कोटी रुपयांची आवश्‍यकता असते. मात्र, अनेक दिवसांपासून लोकांना हवी तेवढी रक्कम न मिळाल्याने शहराला किमान दोन हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. बॅंकांनी तर साडेतीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मागणी रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदविली आहे. सुरवातीला शहरात 112 कोटी आणि 197 कोटी रुपयांचे दोन कंटेनर आले होते. तेव्हापासून पैसेच आले नसल्याने बॅंका हवालदिल झाल्या.

कॅश आणायची कुठून?
बॅंकांनी ग्राहकांना देण्यासाठी आपली करन्सी चेस्ट रिकामी केली आहे. आता त्यांना मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शाखांमधून पैसे मागवून ग्राहकांना द्यावे लागत आहेत. बॅंका जेवढी कॅश उपलब्ध होईल तेवढी दिवसभर ग्राहकांना दिली जाते. त्यानंतर नो कॅशचा बोर्ड लावावा लागत आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून कॅश कधी मिळणार याचे कोणतेही उत्तर दिले जात नसल्याने बॅंकांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे आहे. बॅंकांकडे असणाऱ्या दोन हजारांच्या नोटासुद्धा आता संपत आल्या आहेत. ग्राहकांच्या खात्यात पैसे असले तरी नवीन नोटांअभावी बॅंकांची तिजोरी सध्या रिकामी झालेली आहे.

एटीएम बंदच, फक्त दोन हजारांची नोट
शहरातील बहुतांश एटीएम सोमवारीसुद्धा बंदच होते. काही मोजक्‍या एटीएमवर गेल्यावर त्यांना दोन हजारांच्या नोटांवर समाधान मानावे लागले. बहुतांश जणांना व्यवहारासाठी शंभर रुपयांच्या नोटांची आवश्‍यकता आहे. मात्र बाजारात दोन हजारांची नवीन नोट असल्याने व्यवहारासाठी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता एटीएममध्ये शंभर रुपयांच्या नोटा येणार कधी याची ग्राहकांना प्रतीक्षा आहे.

-बॅंकांकडील रोकड संपली
-कॅशची जमवाजमव करताना कसरत
-पैशांसाठी अनेकांची बॅंकांमध्ये हुज्जत
-बहुतांश एटीएम कॅशलेस
-खात्यात पगार, खिसे रिकामे

Web Title: empty bank