फौजफाट्यासह गेले अन्‌ चार अतिक्रमणे हटवून आले!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद - नारेगाव येथील सुखना नदीच्या पात्राला शेकडो अतिक्रमणांनी विळखा घातला असून, थोडाही पाऊस झाला की, शेकडो घरांत पाणी शिरत आहे. शनिवारी (ता. २३) नदीकाठच्या भागांत हाहाकार उडाल्यानंतर महापालिका प्रशासन मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमणे हटविण्यासाठी या भागात पोचले; मात्र दिवसभरात अवघ्या चार अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला. पाऊस व यंत्र बंद पडल्याने कारवाई थांबविण्यात आली. 

नारेगाव परिसरातून वाहणाऱ्या सुखना नदीच्या पात्रामध्ये गेल्या काही वर्षांत शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. कधीकाळी ४० फुटांचे असलेले पात्र सध्या दहा ते १२ फूट एवढेच शिल्लक राहिले आहे. अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी जागाच शिल्लक नाही. छोटे-मोठे पाऊस होताच पाणी तुंबून नागरिकांच्या घरांत पाणी शिरत आहे. 

शनिवारी रात्री सुमारे तीनशे चे चारशे घरांत पाणी शिरल्याने खळबळ उडाली होती. हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या विरोधात सोमवारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता; मात्र महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आश्‍वासनानंतर माघार घेण्यात आली.

महापौरांनी घेतला धसका  
नागरिकांच्या आंदोलनाचा भडका उडू नये म्हणून सकाळी आठ वाजताच महापौरांनी नारेगाव गाठले. सोबत शहर अभियंता सखाराम पानझडे, प्रशासकीय अधिकारी सी. एम. अभंग, पाठक, आरोग्य, मलेरिया विभागाचे अधिकारी घेऊन ते गेले. अतिक्रमणे हटविण्याची तातडीने कारवाई सुरू करण्याचे आदेश देऊन नागरिकांना आंदोलन न करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी नगरसेवक राजू शिंदे, गोकुळसिंग मलके, संगीता सानप यांचीही उपस्थिती होती. 

थातूरमातूर कारवाईबद्दल नाराजी 
महापालिकेच्या कारवाईबाबत नगरसेवक श्री. शिंदे व मलके यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या पद्धतीने नागरिकांना कारवाई अपेक्षित होती, तसे काहीच झाले नाही. थातूरमातूर कारवाई केली जात असल्याबद्दल महापौरांकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

यंत्र पडले बंद 
महापालिकेकडे असलेले तसेच सिडको पोलिसांचे पथक, अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी एक जेसीबी, पोकलेन अशी यंत्रणा घेऊन महापालिकेचे पथक नारेगावला पोचले; मात्र दिवसभरात केवळ चार अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यात पोकलेन यंत्र बंद पडल्याने व पाऊस आल्यानंतर कारवाई थांबविण्यात आली. 

Web Title: encroachment crime