वाहनचालकांचे धकले, पादचाऱ्यांकडेही बघा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

औरंगाबाद - रस्ते अडविणाऱ्या माठ विक्रेत्यांना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दम भरला. त्यानंतर अतिक्रमणही दूर होत आहे. परिणामी बीड बायपासवर संभाव्य
अपघाताला आळा बसू शकतो; पण शहरातील बहुतांश फुटपाथ माठवाले व किरकोळ विक्रेत्यांनी गिळंकृत केलेले आहेत. त्यामुळे आयुक्तांशिवाय इतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती असल्यास पादचाऱ्यांचाही प्रवास सुरक्षित होऊ शकतो. 

बीड बायपासवर रस्त्यालगत बसलेल्या माठ विक्रेत्यांना पोलिस आयुक्‍तांनी दम भरल्यानंतर दोन पावले मागे सरकून विक्रेत्यांनी फुटपाथ मोकळा केला. पोलिस आयुक्‍तांनी इच्छाशक्ती  दाखविल्याने महापालिकेलाही न जमलेले काम काही तासांतच पोलिसांनी करून दाखविले. मात्र, शहराच्या इतर भागांत रस्त्यांवरून चालणाऱ्यांची बिकट स्थिती आहे. शहरातील काही फुटपाथ गेल्या अनेक वर्षांपासून माठ, किरकोळ विक्रेत्यांनी ताब्यात घेतलेले आहेत. तेथेच त्यांचा वर्षानुवर्षे संसारही सुरू आहे. हंगामी व्यावसायिक म्हणून आलेले माठ विक्रेते फुटपाथचे मालक असल्याच्या आर्विभावात असतात. पोलिस आयुक्तांनी बीड बायपासवर आपला खाक्‍या दाखविला; पण हीच कृती आता शहरातील फुटपाथबाबत पोलिसांनी करावी, अशी सामान्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत. 
 
यांना स्वतंत्र जागा का नाही? 
किरकोळ विक्रेत्यांनी फुटपाथवर ठाण मांडल्यामुळे नागरिकांच्या पैशाचा दुकानांखाली गट्टू बसविण्यासाठी चुराडा केला जातो का, असा प्रश्नही नागरिकांना पडत आहे. शहरात हंगामी  व्यवसायासाठी स्वतंत्र जागा दिली जाते. दिवाळीनिमित्त फटाका विक्रेत्यांना स्वतंत्र जागा मिळते; पण माठ विक्रेते व किरकोळ व्यावसायिकांनाही स्वतंत्र जागा, परवानगी देऊन त्यांचा बाजार थाटावा. परिणामी, पादचाऱ्यांची सोय आणि माठवाल्यांना हक्काची बाजारपेठ मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 
 
इथे फुटपाथ आहेत नावालाच! 

  •  जिल्हा परिषद मैदान ते शिशुविहार शाळा 
  •  सेव्हनहिल चौक ते गजानन महाराज मंदिर 
  •  एपीआय कॉर्नर ते मुकुंदवाडी स्मशानभूमी 
  • चिकलठाणा बाजार ते केंब्रिज शाळा 
  •  एसबीआय प्रशिक्षण केंद्र, जळगाव रोड 
     
Web Title: encroachments on footpath in Aurangabad