ठेका संपल्यापासून पोषण आहार रामभरोसे!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

बीड - बचत गट व अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण आहार पुरवला जात असल्याचे सांगून महिन्याकाठी लाखो रुपयांची देयके उचलली जात असली तरी अंगणवाड्यांतील बालकांपर्यंत आहारच पोचत नसल्याचे चित्र महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात आहे. काही सेविकांनी याला ठाम नकार दिला असून काही ठिकाणी कागदोपत्री आहार पुरवठा सुरू असल्याचा प्रकारही सुरू आहे.

बीड - बचत गट व अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण आहार पुरवला जात असल्याचे सांगून महिन्याकाठी लाखो रुपयांची देयके उचलली जात असली तरी अंगणवाड्यांतील बालकांपर्यंत आहारच पोचत नसल्याचे चित्र महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात आहे. काही सेविकांनी याला ठाम नकार दिला असून काही ठिकाणी कागदोपत्री आहार पुरवठा सुरू असल्याचा प्रकारही सुरू आहे.

महिला व बालविकास प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात 2406 मोठ्या, तर 598 लहान अशा एकूण 3004 अंगणवाड्या आहेत. त्यांत दोन लाख 30 हजार बालके शिक्षण घेतात. बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा ठेका गत आठ महिन्यांपासून संपला आहे. तेव्हापासून पोषण आहार पुरवठा रामभरोसे सुरू आहे. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या साहित्यातून काही दिवस बालकांना आहार मिळाला. दरम्यानच्या काळात ठेका रद्द झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाने काही सूचना दिल्या.

गावपातळीवरील बचत गटांमार्फत पोषण आहार पुरवावा किंवा बचत गट नसलेल्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनीच तो पुरवून देयके सादर करावीत, असा या सूचनांचा आशय होता. त्यानुसार 341 अंगणवाड्यांना स्थानिक बचत गटांमार्फत, तर उर्वरित सर्व ठिकाणी स्वत: अंगणवाडी सेविका पोषण आहार पुरवत असल्याच्या नोंदी दिसत असल्या तरी बहुतांश ठिकाणी पोषण आहार कागदावरच सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

काहींची ठाम ना, काहींचे फावले
पुरवठा आहाराचा ठेका रद्द झाल्यानंतर स्थानिक बचत गटांमार्फत किंवा बचतगट नसलेल्या ठिकाणी स्वत: अंगणवाडी सेविकांनी प्रचलित दराने (प्रतिबालक चार रुपये 92 पैसे प्रतिदिन) खिचडी, उसळ व मोड आलेले धान्य असा पोषण आहार पुरवावा, अशा सूचना महिला व बालविकास विभागाने दिल्या. एवढ्या कमी दरात असा आहार पुरवठा अशक्‍य असल्याने बहुतांश गटांनी व सेविकांनीही त्याला नका दिला; पण फक्त कागदोपत्री पुरवठा करायचा असलेल्यांकडून मात्र बिले दाखल करून देयके उचलणे सुरू आहे. काही ठिकाणी केवळ खिचडीच मिळत आहे, तर काही ठिकाणी आहारच नाही. एखादा पालक तक्रार करायला गेला तर वरूनच आहार बंद असल्याचे उत्तरही तयार आहे. मंत्र्यांनीच लक्ष घालून पोषण आहाराचा सुरळीत पुरवठा करावा, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

- जिल्ह्यात 3004 अंगणवाड्या
- दोन लाख 30 हजार बालके
- आठ महिन्यांपूर्वी संपला आहाराचा ठेका
- बचतगट, सेविकांनीच पुरवठ्याची सूचना
- अनेक ठिकाणी कागदोपत्रीच पुरवठा

Web Title: end of the contract from the Nutrition foods