एंड्युरन्सचेही पाऊल आता ‘ऑरिक’कडे!

आदित्य वाघमारे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पाचशे जणांना रोजगार
एंड्युरन्स कंपनीची स्थापना वर्ष १९८६ मध्ये करण्यात आली. भारत आणि युरोपीयन बाजारपेठेत आपला राबता असलेल्या या कंपनीचे भारतात सोळा, तर युरोपात नऊ कारखाने आहेत. मशिन्ड कास्टिंग, डाय कास्टिंग, अलॉय व्हील्स, क्‍लच असेम्ब्ली, ब्रेकिंग यंत्रणा आदी उत्पादने या कंपनीची आहेत. सध्या या कंपनीतर्फे बजाज, एचडी मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, महिंद्रा, रॉयल एनफिल्ड या कंपन्यांसाठी सुटे भाग तयार केले जातात. चार हजार जणांना रोजगार देणाऱ्या या कंपनीकडून ऑरिकमध्ये अजून सुमारे पाचशे जणांना थेट रोजगार दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद - मूळची औरंगाबादकर असलेल्या एंड्युरन्स ऑटोमोबाईल कंपनीने आपला विस्तार करण्यासाठी आता ‘ऑरिक’ची निवड केली आहे. ‘डीएमआयसी’च्या शेंद्रा नोडमध्ये ही कंपनी सुमारे साडेचारशे कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. 

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या शेंद्रा नोडमध्ये गुंतवणूकदारांचा ओघ सुरूच आहे. लघुउद्योगांनी सुमारे पस्तीस प्लॉट घेतले आहेत. त्यातील दोनने उत्पादन सुरू झाले असून, एक कंपनी आपले उत्पादन सुरू करण्याच्या उंबरठ्यावर आहे. ३,६०० कोटींची एकूण गुंतवणूक मिळवून देशाच्या डीएमआयसी प्रकल्पात अव्वल स्थान मिळविणाऱ्या ऑरिकने बिडकीनमध्ये गत महिन्यात ६,८०० कोटींची मेगा गुंतवणूक मिळविली होती. 

वाळूजमध्ये अनेक प्लॅंट असलेल्या औरंगाबादकर ऑटोमोबाईल कंपनी एंड्युरन्सने आता ऑरिक शेंद्राची निवड केली असून, सुमारे चाळीस एकर जागेवर त्यांनी आपला कारखाना उभारण्याची तयारी चालविली आहे. येथे जागा घेण्यासाठी एंड्युरन्सने अर्ज केला असून, पाच टक्के अनामत रक्कम औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडकडे जमा केली आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांना लागणारे सुटे भाग तयार करण्यात ही कंपनी पारंगत आहे. ‘ऑरिक’मध्येही याच प्रकारचे उत्पादन एंड्युरन्सतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: endurance company Auric