रॉंग साईड खासगी बसच्या धडकेत अभियंता ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

औरंगाबाद - नगर नाका उड्डाणपुलावर उलट्या दिशेने भरधाव निघालेल्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. 21) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रूपेश शशी गोपालन (वय 25, रा. संगीता कॉलनी) असे मृताचे नाव आहे. ते वाळूज औद्योगिक परिसरातील एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरीला होते.

औरंगाबाद - नगर नाका उड्डाणपुलावर उलट्या दिशेने भरधाव निघालेल्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. 21) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रूपेश शशी गोपालन (वय 25, रा. संगीता कॉलनी) असे मृताचे नाव आहे. ते वाळूज औद्योगिक परिसरातील एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरीला होते.
रूपेश यांची शुक्रवारी रात्रपाळी होती. ड्यूटीवरून ते शनिवारी सकाळी दुचाकीने (एमएच- 20, बीझेड- 4822) घराकडे निघाले होते. नगर रस्त्यावरील रेल्वे उड्डणपुलावरून रूपेश हा आपल्या दिशेने जात होता.

दरम्यान, चुकीच्या विरुद्ध दिशेने आलेल्या नागपूर-पुणे या विजयानंद ट्रॅव्हल्सच्या बसने (एमएच- 04, जी- 8821) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात रूपेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास जमादार प्रल्हाद मोटे करीत आहेत.

कुटुंबाचा एकुलता एक आधार गेला
रूपेश यांचे वडील एका खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचे रूपेश हे एकुलते एक पुत्र होते. रूपेश यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्याबरोबरच कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी काम स्वीकारावे लागले. या अपघाताने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे.

मित्रांना रडू कोसळले
अपघाताची माहिती मिळताच रूपेशच्या मित्रांनी घाटी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मित्र गेल्याने अनेकांना अश्रू आवरता येत नव्हते. सध्या रेल्वे उड्डणपुलाच्या बाजूने रस्त्याचे काम सुरू असल्याने उड्डाणपुलावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. या मार्गावर बेदकारपणे वाहने चालविणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा रूपेशच्या मित्रांनी व्यक्त केली.

Web Title: engineer death in accident