व्हॉट्‌सऍप ग्रुपवर शिवीगाळ;  महावितणच्या अभियंत्याचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

बीड : कामांतील अडचणी, निरोपांची देवाण-घेवाण आणि अडचणींचे निवारण करण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्‌सअप ग्रुपवर असंवैधानिक भाषा आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या महावितरणमधील सहायक अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

बीड : कामांतील अडचणी, निरोपांची देवाण-घेवाण आणि अडचणींचे निवारण करण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्‌सअप ग्रुपवर असंवैधानिक भाषा आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या महावितरणमधील सहायक अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार घडल्याच्या दुसऱ्या दिवशीच मंगळवारी (ता. 27) अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी संतराम यशवंत गित्ते यांचे निलंबन केले. 

संतराम यशवंत गित्ते हे महावितरणमध्ये सहायक अभियंता आहेत. त्यांची नेमणूक महावितरणच्या बीड ग्रामीण उपविभागाच्या नेकनूर शाखा कार्यालयात आहे. महावितरण संदर्भात स्थानिक पातळीवरील अडचणी, वरिष्ठांचे निरोप आणि अडचणींची-माहितींची देवाण-घेवाण तसेच चर्चा आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी "मीटर डेलीयन अर्जंट' नावाचा व्हॉट्‌सअप ग्रुप आहे. या ग्रुपवर महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसह मंडळ कार्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारीही आहेत.

दरम्यान, सोमवारी (ता. 26) दुपारी सहायक अभियंता संतराम गित्ते यांनी आपल्या मोबाईल क्रमांकावरून (7350565499) या व्हॉट्‌असप ग्रुपवर माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांबाबत असंवैधानिक भाषा वापरली. तसेच, शिवीगाळही केली. त्यामुळे संतराम गित्ते यांना अधीक्षक अभियंता राजेंद्र सरग यांनी श्री. गित्ते यांच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, सोशल मीडियावरून असंवैधानिक भाषेचा वापर केल्यावरून शासकीय अधिकाऱ्याचे निलंबन होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineer suspended in beed