ईपीएस-95 पेन्शनधारकांचे खासदारांच्या घरासमोर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

ईपीएस-95 राष्ट्रीय समन्वय समितीचे राज्याध्यक्ष स. ना. अंबेकर यांच्या
नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या
कर्मचारी निवृत्तीवेतन योजना 1995 नुसार सेवेतून निवृत्त झालेल्या
अस्थापनातील कामगारांना दरमहा 500 ते 2500 रुपये पेन्शन मिळते.

नांदेड - विविध अास्थापनातील निवृत्ती कर्मचाऱ्यांना गगनाला
भिडलेल्या महागाईच्या काळात अत्यल्प मानधन मिळत असल्याने जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ईपीएस-95 पेन्शन धारकांचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात लोकसभेमध्ये मांडावा म्हणून रविवारी (ता. 15) खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून निवेदन दिले.

ईपीएस-95 राष्ट्रीय समन्वय समितीचे राज्याध्यक्ष स. ना. अंबेकर यांच्या
नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या
कर्मचारी निवृत्तीवेतन योजना 1995 नुसार सेवेतून निवृत्त झालेल्या
अस्थापनातील कामगारांना दरमहा 500 ते 2500 रुपये पेन्शन मिळते. सध्याच्या महागाईच्या काळामध्ये हे वेतन अतिशय तुटपुंजे आहे. परिणामी या पेन्शनधारकांना अनेक अडचणींना आज सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात 60 हजार पेन्शधारक असून, नांदेड जिल्ह्यामध्ये 17 हजार पेन्शनधारक उर्वरीत आयुष्य काढण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

उतरत्या वयामध्ये अंगमेहनतीची कामे करून दिवस काढावे लागत आहेत. यासंदर्भात समन्वय समितीतर्फे अनेक आंदोलने केलीत, मंत्रालयाचे उंबरठे झिजविले, परंतु त्याचा प्रशासनावर काहीच परिणाम झालेला नाही. त्यासाठी आता शेवटचा प्रयत्न म्हणून राज्यातील सर्व खासदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून त्यांना निवेदन देण्यात येत आहे. त्यानुसार नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर रविवारी आंदोलन करून त्यांना निवेदन दिले. यावरही समाधानकारक प्रश्न सुटला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन राज्यभर करण्यात येणार असल्याचेही श्री. अंबेकर यांनी स्पष्ट केले. आंदोलनात राज्याचे अध्यक्ष स. ना. अंबेकर यांच्यासह अनंत कवटेकर, जि. एल्लया, बि. आर. बनसोडे, दिलीप मोकाटे, स. गगनसिंग, विश्वनाथ शिंदे, श्री. गंगातिरे, श्री. गंजेवार, श्री. कोकाटे, बाराव पाटील, खंडेराव नाईक, शकुंतला खंदारे, महानंदा ससाने, श्रीमती रमादेव यांच्यासह पेन्शनर उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EPS 95 pensioners agitation in front of MPs house