‘समाजकल्याण’च्या योजना राबविण्यात त्रूटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

आदिवासी, मागास, बौद्ध, मागासवर्गीय घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवते. मात्र, जिल्ह्यात या योजनांची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी आढळत आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला दलित वस्ती सुधारणांच्या कामांसाठी २८ कोटी रुपयांचा निधी आला होता. पण, राजकीय संघर्षात या निधीचे वितरण रखडले आहे. मर्जीतल्या कार्यकर्त्यांना निधी देण्याचे नियोजन सभापतींनी केले. मात्र, निकषांचे पालन करून वितरण व्हावे, असा आग्रह जिल्हा परिषद अध्यक्षांनी धरला. समाजकल्याण विभागाची अनेक ठिकाणी वसतिगृहे असली तरी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळत नाहीत.

आदिवासी, मागास, बौद्ध, मागासवर्गीय घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवते. मात्र, जिल्ह्यात या योजनांची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी आढळत आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला दलित वस्ती सुधारणांच्या कामांसाठी २८ कोटी रुपयांचा निधी आला होता. पण, राजकीय संघर्षात या निधीचे वितरण रखडले आहे. मर्जीतल्या कार्यकर्त्यांना निधी देण्याचे नियोजन सभापतींनी केले. मात्र, निकषांचे पालन करून वितरण व्हावे, असा आग्रह जिल्हा परिषद अध्यक्षांनी धरला. समाजकल्याण विभागाची अनेक ठिकाणी वसतिगृहे असली तरी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळत नाहीत. सामाजिक न्याय भवनाची इमारत उभारली, पण बीडमध्ये या इमारतीत न्याय विभागाचेच कामकाज होत आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती संस्थाचालकांनीच घशात घातल्याचे समोर आले आहे. दलित वस्त्यांमध्ये होत असलेली कामे निकृष्ट होत आहेत. 

जिल्ह्यातील सद्यःस्थिती
  सामाजिक न्यायभवनाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण
  आदिवासी मुलांसाठी वसतिगृहांची बांधकामे
  दलित वस्त्यांमध्ये नाल्या, रस्ते, पथदिव्यांची कामे
  नवबौद्धांसाठी शेती अवजारे, शेळी, गायींचे वाटप 
  नवबौद्धांसाठी घरकुलांचे वाटप
  नवबौद्धांसाठी ट्रॅक्‍टरचे वाटप 
  विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफीसह शिष्यवृत्तींचे वाटप. 

अपेक्षा
  समाज कल्याण विभागाचा निधी पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचावा
  पात्र लाभार्थ्यांची अडवणूक टाळावी 
  लाचखोर अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे नोंदावेत 
  लाभाचे प्रस्ताव मागविण्याऐवजी पात्र घटकांचा शोध घेऊन व्हावी अंमलबजावणी
  विभागाच्या निधीवाटपातील प्रचलित टक्केवारी पद्धत बंद व्हावी
  आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना गरम पाणी, पोषक आहार, कपडे मिळावेत 
   समाज कल्याण विभागासाठीच्या सर्व योजना आणि कार्यालये एकाच इमारतीत असावेत

तज्ज्ञ म्हणतात
मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक पद्धतीने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यासाठी चांगला निवारा, सकस आहार आदी मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरविण्याची आवश्‍यकता आहे. अनुसूचित जाती, जमातीसाठी असणाऱ्या योजना सक्षमपणे राबविल्या पाहिजेत, सामाजिक दर्जा उंचाविण्यासाठी समाजकल्याण विभागाने कायमस्वरूपी दक्ष राहणे अपेक्षीत आहे. 
कचरू खळगे

ग्रामीण भागामध्ये पायाभुत सुविधा पुरविण्याबरोबरच विशेष करून समाजकल्याण विभागांकडून मागासवर्गीयांसाठी बेघरांना घरकुल, स्वच्छतागृह, रस्ते आदी मूलभूत गोष्टी थेट मागासवर्गीय कुटुंबीयांपर्यंत पोहचविण्याची आवश्‍यकता आहे. आजही ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमातीच्या वस्तीमध्ये आलेले पथदिवे व त्या योजना त्याच भागामध्ये राबविण्याची खरी गरज आहे. 
बाबुराव पोटभरे

मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळण्याची आवश्‍यकता आहे. त्याप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये वसतिगृह सुरू करण्याची गरज आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी योजना बंद अवस्थेत असून तिला पुनर्जीवित करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागापर्यंत मागासवर्गीय समाजासाठी पायाभूत सुविधा प्रभाविपणे अमलात आणण्याची आवश्‍यकता आहे. 
विजय अलझेंडे

समाज कल्याण विभाग हा अनुसूचित जाती-जमातीसाठी आहे. या विभागाने त्यांचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक पातळीवर विचार केला पाहिजे. समाजाच्या गरजा जाणून घ्यायला हव्यात. तशा सुविधा दिल्या पाहिजे. सामाजिक पातळीवर गाव, वस्ती, वाडीत जाऊन समाजाच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार,  अंधश्रद्धा, सामाजिक या विषयी कार्यक्रम घेतले पाहिजेत.
कडुदास कांबळे
  
समाज कल्याण विभागाच्या योजना खऱ्या अर्थाने वंचित व पीडितांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. समाज कल्याण विभागाने जाहीर केलेले कार्यक्रम अथवा योजना या नुसत्या कागदावर किंवा संचिकेत न राहता त्या लोकाभिमुख करून कार्यान्वित व्हाव्यात.
सुभाष निकम

Web Title: Error implemented the Social Welfare Scheme