एका मताचे मोल 'अनमोल',  जागरूकतेचाही महत्त्वाचा 'रोल' 

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 25 जानेवारी 2018

औरंगाबाद : आपल्या विचारांचा, विकास करणारा, माणुसकी जपणारा लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मतदानाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. त्यामुळेच लोकशाही असलेल्या आपल्या देशात मताचे मोल अनमोल आहे. कुणी कितीही श्रीमंत असो की गरीब त्यास निवडणुकीत विजयी किंवा पराभूत करण्याचे काम मताद्वारेच होते, हा खऱ्या अर्थाने सामान्यांचा सर्वोच्च असा हक्क, अधिकारच म्हणावा लागेल. 

औरंगाबाद : आपल्या विचारांचा, विकास करणारा, माणुसकी जपणारा लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मतदानाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. त्यामुळेच लोकशाही असलेल्या आपल्या देशात मताचे मोल अनमोल आहे. कुणी कितीही श्रीमंत असो की गरीब त्यास निवडणुकीत विजयी किंवा पराभूत करण्याचे काम मताद्वारेच होते, हा खऱ्या अर्थाने सामान्यांचा सर्वोच्च असा हक्क, अधिकारच म्हणावा लागेल. 
आपले एक मत परिवर्तन करू शकते, अशा आशयाच्या घोषणा निवडणूक काळात सर्रास ऐकायला मिळतात. जवळपास निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच पक्षांच्या सभेतील हा ठरलेला शब्द होय. एका मतामुळे देशभरातील अनेक ठिकाणच्या निवडणुकीत इतिहास घडल्याच्या नोंदी आहे. त्यामुळेच कितीही मोठा बादशहा असला तरी त्याला निवडणुकीच्या काळात मतदारांसमोर हात जोडण्याची वेळ येतेच. बऱ्याचदा ऐनवेळी हात जोडणाऱ्यांना मतदार हात देतातच असेही होत नाही. त्यामुळे मताची किंमत अनमोल आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्‍क बजावायलाच हवा, असे आवाहन विविध पातळीवरून करण्यात येत आहे. मात्र, मतांची टक्‍केवारी वाढविण्यासाठी अजून प्रभावीपणे काय काय करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

मतदारांचा आकडा साडेसव्वीस लाखांवर 
जिल्हा प्रशासनातर्फे नुकतीच नवमतदारांची नोंदणी मोहीम राबवण्यात आली. वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या तसेच मतदारयादीत नावे नसणाऱ्या नागरिकांची नोंदणी प्रभावीपणे झाल्याने जिल्ह्यात तब्बल 24 हजार नवमतदार वाढले आहेत. यात सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक साडेचार हजार मतदारांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील साडेनऊ हजार नावे विविध कारणांनी वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांचा आकडा साडेसव्वीस लाखांवर पोचला आहे. 
निवडणूक विभागाकडून जिल्ह्यात 3 ऑक्‍टोबर 2017 ते एक जानेवारी 2018 दरम्यान नवमतदारांसाठी विशेष नोंदणी मोहीम झाली. यात वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नवमतदारांकडून वयाचा पुरावा घेत त्यांच्या नावाची नोंदणी विविध ठिकाणी करण्यात आली. यासाठी सर्व तहसील कार्यालयांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच महाविद्यालयात नोंदणी प्रक्रिया झाल्याने जिल्ह्यात तब्बल 23 हजार नऊशे नवमतदार वाढण्यात प्रशासनाला यश आले. मोहिमेपूर्वी जिल्ह्यात 26 लाख 36 हजार 353 मतदार होते. मात्र, आता तो आकडा 26 लाख 50 हजार 584 वर पोचला. यादरम्यान निधन झालेल्या, लग्न करून माहेरी गेलेल्या तसेच इतर कारणांनी जिल्ह्याबाहेर गेलेल्या तब्बल 9 हजार 670 मतदारांची नावे वगळली आहेत.

एक मताचे मोल... 
पाच वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील डोमेगाव (ता. अंबड) येथील पद्माबाई सांगळे यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. त्या वेळी त्यांच्यासह विरुद्ध पॅनेलमधील उमेदवारास समान मते पडली. त्यामुळे टॉस करावा लागला. त्या वेळी एक मताचे मोल काय असते, याची जाणीव झाल्याची भावना पद्माबाई यांचे चिरंजीव रमेश सांगळे यांनी व्यक्‍त केली.

Web Title: esakal marathi news new voter registration aurangabad