संजय गांधी योजनेतील चौदाशे लाभार्थी झाले निराधार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

संजय गांधी निराधार योजना विभागात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ निवृत्ती योजना व अपंग व्यक्तींसाठी विशेष आर्थिक साहाय्य देण्यात येते. मुलगा सज्ञान झाल्याने अथवा शासकीय नोकरीत असल्याने यासह बाहेरगावचे वास्तव्य, कुटुंबातील उत्पन्नात वाढ, बहुभूधारक अशी कारणे दर्शवून तलाठ्यांनी अहवाल तयार केला. त्या अहवालानुसार तालुक्‍यातील जवळपास एक हजार चारशे लाभार्थींचे ऑगस्ट 2017 पासून अनुदान बंद करण्यात आले आहे. 

उमरगा : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत असलेल्या निराधार, विधवा, अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या विशेष साहाय्य योजनेतील जवळपास चौदाशे लाभार्थींना योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे. तलाठ्यांच्या अहवाल प्राप्तीनंतर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाने संबंधित लाभार्थींना निकषपात्र ठरत नसल्याचे कारण दाखवत नोटिसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अचानक अनुदान (पगार) बंद झाल्याने हतबल झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना अनुदानासाठी पर्याय शोधावा लागत आहे. 

संजय गांधी निराधार योजना विभागात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ निवृत्ती योजना व अपंग व्यक्तींसाठी विशेष आर्थिक साहाय्य देण्यात येते. मुलगा सज्ञान झाल्याने अथवा शासकीय नोकरीत असल्याने यासह बाहेरगावचे वास्तव्य, कुटुंबातील उत्पन्नात वाढ, बहुभूधारक अशी कारणे दर्शवून तलाठ्यांनी अहवाल तयार केला. त्या अहवालानुसार तालुक्‍यातील जवळपास एक हजार चारशे लाभार्थींचे ऑगस्ट 2017 पासून अनुदान बंद करण्यात आले आहे. 

शोधावा लागतोय पर्याय 
तलाठ्यांचा अहवाल योजनेच्या निकषानुसार मान्य करण्यात आला असला तरी अनुदान बंद केलेल्या अनेक लाभार्थींची आर्थिक स्थिती अजूनही नाजूक आहे. ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात अनुदानाची रक्कम लाखमोलाची ठरत होती. मुले जरी सज्ञान झाली असली तरी त्यांच्या हाताला काम नाही. अशा स्थितीत योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याने लाभार्थी हतबल झाले आहेत. विशेष अर्थसाहाय्य योजनेतील दुसऱ्या योजनेसाठी तरी पात्र ठरवावे यासाठी उठाठेव करावी लागत आहे. प्रस्तावासाठी लागणारी कागदपत्रे व प्रस्ताव मंजुरीसाठी मध्यस्थांसाठी आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे. 

महिन्याला 93 लाखांचे वाटप 
विशेष अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत तालुक्‍यात चौदा हजार 566 लाभार्थी असून प्रत्येक महिन्याला 92 लाख 89 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येते. मध्यंतरी अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी मराठवाडा ग्रामीण बॅंकेत बऱ्याच अडचणी आल्या होत्या. आता तहसील प्रशासनाने आयसीआयसीआय बॅंकेमार्फत थेट राष्ट्रीयीकृत बॅंकेतील संबंधित लाभार्थीच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील लाभार्थींना त्याच ठिकाणी अनुदान मिळणार आहे. 

Web Title: esakal marathi news sanjay gandhi niradhar yojana news

टॅग्स