शहरात साचला सातशे टन कचरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

मांडकी (नारेगाव) येथील कचरा डेपो तातडीने हटविण्यात यावा, अन्यथा शुक्रवारपासून (ता. 13) महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या अडविण्यात येतील, असा इशारा नागरिकांनी सोमवारी (ता. नऊ) महापालिका आयुक्तांना दिला होता. या वेळी आयुक्तांनी नागरिकांनाच तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, आंदोलन कराल तर गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली.

औरंगाबाद : मांडकी (नारेगाव) येथील कचरा डेपोच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा तिढा शनिवारी (ता. 14) दुसऱ्या दिवशीही सुटला नाही. त्यामुळे शहराची "कचराकुंडी' झाली असून, सुमारे चारशे ट्रक म्हणजेच सातशे टन कचरा वेगवेगळ्या भागांत पडून आहे. अधूनमधून शहरात पाऊस होत असून, या पावसाने कचरा सडून त्यातून दुर्गंधी निघत आहे. दरम्यान, महापालिका पर्यायी जागेचा शोध घेत असून, कोणी कचरा टाकू देत नाही, मी काय करू, असे हतबल उद्‌गार आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी काढले. 

मांडकी (नारेगाव) येथील कचरा डेपो तातडीने हटविण्यात यावा, अन्यथा शुक्रवारपासून (ता. 13) महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या अडविण्यात येतील, असा इशारा नागरिकांनी सोमवारी (ता. नऊ) महापालिका आयुक्तांना दिला होता. या वेळी आयुक्तांनी नागरिकांनाच तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, आंदोलन कराल तर गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली. आयुक्तांच्या धमकीला न जुमानता नागरिकांनी शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले. त्यानंतर भीतीपोटी महापालिकेने कचरा डेपोकडे केवळ दोनच गाड्या पाठविल्या. त्या गाड्यादेखील अडविण्यात आल्या. त्यानंतर नक्षत्रवाडी भागातील खुल्या जागेवर कचरा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र त्या भागातील नागरिकांनीदेखील रस्त्यावर उतरत आंदोलन केले. त्यामुळे दोन दिवसांपासून शहरातून एकही ट्रक कचरा बाहेर गेलेला नाही. शुक्रवारी पहाटे भरलेल्या ट्रक सेंट्रल नाका येथे उभ्या आहेत. त्यातील कचरा सडण्यास सुरवात झाली आहे; तसेच शहरातील छोट्या-छोट्या डंपिंग ग्राउंडवर सातशे टन कचरा पडून आहे. आंदोलनाचा तिढा सुटण्याची शक्‍यता कमी असल्यामुळे येणाऱ्या काळात कचऱ्याचा प्रश्‍न आणखी गंभीर बनण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात आयुक्तांशी संपर्क साधला असता, आम्ही जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासोबतदेखील चर्चा करण्यात आली; मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. शहराचा कचरा टाकू देण्यास कोणीच तयार नाही. मी आता काय करणार, असे हतबल उद्‌गार आयुक्तांनी काढले. 

विभागीय आयुक्तांनी बोलाविली बैठक 
मांडकी (नारेगाव) येथील कचरा डेपोला विरोध झाल्याच्या पाश्‍वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी (ता. 17) सर्व विभागांची बैठक बोलाविली असल्याची माहिती आयुक्‍त श्री. मुगळीकर यांनी दिली. या बैठकीत जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. 

Web Title: esakal news auranagabad dumping ground issue

टॅग्स