तीनशे खाटांचे होणार राज्य कर्करोग रुग्णालय 

योगेश पायघन 
रविवार, 9 जुलै 2017

केंद्राच्या 43 कोटींच्या निधीचे पत्र प्राप्त झाले. त्यामुळे विस्तारीकरणाच्या प्रक्रियेस वेग आला आहे. महिनाभरात केव्हाही कामाचे भूमिपूजन होऊ शकते. पाच महिन्यांपूर्वीच एईआरबीच्या मानकानुसार टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे चाळीस पदांचा वर्ग एक ते वर्ग चारपर्यंतच्या पदांचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. दोन वर्षांत राज्य कर्करोग संस्था अद्ययावत उपचारांसह पूर्ण क्षमतेने सेवा देईल. 
- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद. 

औरंगाबाद : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास गत वर्षी राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला. त्या अनुषंगाने आता या रुग्णालयाच्या विस्तारीकरण प्रक्रियेला वेग आला असून, शंभर खाटांचे हे रुग्णालय 300 खाटांचे होणार आहे. त्यासाठी केंद्राकडून 120 कोटींपैकी पहिल्या टप्प्यात 43 कोटी निधी प्राप्त झाला. शिवाय राज्य सरकारनेही त्यांच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या दोन वर्षांत अत्याधुनिक उपचारांसाठी हे सज्ज होणार असून, यामुळे उपचारासाठी सध्या असलेल्या प्रतीक्षा यादीची कटकट संपणार आहे. 

मराठवाड्यात कर्करोगाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर मराठवाड्यात अद्ययावत उपचार व्हावेत, या हेतूने शासनाने 15 ऑक्‍टोबर 2016 ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा दिला. वर्ष 2012 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्याची दाखल घेऊन केंद्र शासनाच्या कुटुंब व आरोग्य कल्याण विभागामार्फत नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटीस, सीव्हीडी आणि स्ट्रोक (एनपीसीडीसीएस) या कार्यक्रमांतर्गत राज्य कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली. राज्य सरकारच्या भागीदारीने देशातील प्रत्येक राज्यात कर्करोग संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. त्यानुसार प्रत्येक राज्यासाठी मिळणाऱ्या एकूण 120 कोटी रुपये खर्चापैकी केंद्राच्या वाट्यातील पंचाहत्तर टक्के निधी हा संबंधित राज्यांनी समाधानकारक कार्यवाही केल्यानंतरच देण्यात येणार आहे. यात केंद्राचा वाटा साठ टक्के; तर राज्याचा वाटा चाळीस टक्के राहणार आहे. याअंतर्गत 165 खाटांची व्यवस्था असलेली इमारत उभी करण्यात येणार आहे. सध्या 100 खाटांची इमारत आहे. याशिवाय इतर दोन बंकरध्ये 35 खाटा असतील. संस्थेच्या स्थापनेसंदर्भात राज्याने व घाटीने दाखविलेली गंभीरता आणि तत्परता; यामुळे केंद्राने तत्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे. 

असा होणार 120 कोटींचा विनियोग 
सध्याच्या इमारतीवर अजून एक मजला चढविला जाणार असून, भाभाट्रॉन (टेलिकोबाल्ट) आणि लिनॅक असे दोन बंकर आणि त्यावर दोनमजली इमारत विस्तारीकरणात 30 कोटी रुपयांतून उभारण्यात येणार आहे. किरणोपचार विभागात लिनिअर ऍक्‍सिलेटर (लि-नॅक), ब्रेकी थेरपीसह आधुनिक यंत्रसामग्रीसाठी 35 कोटी, रेडिओ डायग्नोसिस विभागासाठी डिजिटल मॅमोग्राफी, डिजिटल रेडिओलॉजी, एमआरटी, सीटी स्कॅनच्या यंत्रांसाठी 23 कोटींचे नियोजन आहे, पॅथॉलॉजी, मायक्रो केमिस्ट्री, मायक्रो बायोलॉजीच्या अद्ययावतीकरणासाठी 5 कोटी रुपयांची यंत्रं, मेडिकल ऑन्कोलॉजी एक कोटी, सर्जिकल ऑन्कोलॉजीला दोन कोटी, ईएनटी विभागाला सव्वा कोटी, बधिरीकरणशास्त्र विभागात 1.5 कोटी, डोळ्यांच्या विभागाला 20 लक्ष; तर स्त्रीरोग विभागाला 38 लाख रुपयांची यंत्रसामग्री प्रस्तावित करण्यात आली आहे. 
 

Web Title: esakal news sakal news aurangabad news cancer hospital