बिबट्यापासून बचावासाठी तरुणाने घेतला विहिरीचा आसरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

हिंगोली : कळमनुरी तालुक्‍यातील कांडली शिवारात आलेल्‍या बिबटयापासून बचाव करण्यासाठी शुभम पतंगे या तरुणाने चक्‍क विहिरीचाच आसरा घेतला. त्‍यानंतर गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली अन्‌ बिबट्याने पलायन केले. मंगळवारी (ता.११) सकाळी साडेसातच्‍या सुमारास हा प्रकार घडला.

हिंगोली : कळमनुरी तालुक्‍यातील कांडली शिवारात आलेल्‍या बिबटयापासून बचाव करण्यासाठी शुभम पतंगे या तरुणाने चक्‍क विहिरीचाच आसरा घेतला. त्‍यानंतर गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली अन्‌ बिबट्याने पलायन केले. मंगळवारी (ता.११) सकाळी साडेसातच्‍या सुमारास हा प्रकार घडला.

कळमनुरी तालुक्‍यातील भोसी, दाती व कांडली शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. दोन महिन्यापूर्वीच दाती शिवारात बिबट्याने एका म्‍हशीचा फडशा पाडला होता. वन विभागाच्‍या ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्याचे अस्‍तित्‍व जाणवले होते. त्‍यामुळे या भागात सतर्क राहण्याच्‍या सूचना देण्यात आल्‍या होत्‍या. 

दरम्‍यान, आज सकाळी कांडली येथील शुभम पतंगे हे हरभरा भिजवण्यासाठी शेतात गेले होते. बाजूला असलेल्‍या त्‍यांचे काका प्रकाश पतंगे यांच्‍या शेतातील आखाड्यावर पाईप घेण्यासाठी ते गेले होते. यावेळी एका वासराजवळ बिबट्या दिसताच पतंगे घाबरून गेले. त्‍यांनी शेतातील विहिरीचा आसरा घेतला. विहिरीमध्ये बसून त्‍यांनी गावकऱ्यांना भ्रमणध्वनीवरून बिबट्याची माहिती दिली. त्‍यानंतर गावकरी निळकंठ देशमुख, श्रीकांत देशमुख, मंगेश पतंगे, चंद्रकांत देशमुख, सोमेश पतंगे, गोलू पतंगे, सतीश पतंगे, शिवाजी सूर्यवंशी, संदीप पतंगे, अंकूश पतंगे, गजानन निर्मले, एकनाथ पतंगे, पिनू पानपट्टे, दीपक पतंगे, निलेश पतंगे यांच्‍यासह गावकऱ्यांनी दुचाकी वाहनावरून शुभम पतंगे यांचे शेत गाठले. आरडाओरड करीत गावकरी आल्‍याने बिबट्याने शेतातून काढता पाय घेतला. त्‍यानंतर या गावकऱ्यांनी शुभम पतंगे यास विहिरीच्‍या बाहेर काढले. बिबट्याच्‍या अस्‍तित्‍वामुळे आता या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: To escape from the leopard Youth took the Shelter of the well