धबधब्यात पडलेल्या पर्यटकाची थरारक सुटका

Escaped tourist from waterfall
Escaped tourist from waterfall

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीजवळच्या सप्तकुंडात गुरुवारी (ता. 22) एक पर्यटक पाय घसरून पडला. वनखात्याच्या हद्दीतील या कुंडातून त्यास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.

अजिंठा लेणीच्या दरीतून वाहणाऱ्या वाघूर नदीवर हा प्रसिद्ध सप्तकुंड धबधबा आहे. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे कातीव कड्यांच्या पोटात तयार झालेल्या या सात कुंडांमध्ये सध्या धबधब्याचे पाणी ओसंडून वाहत आहे. याच कड्याजवळ धोकादायक जागी फिरणारा अशोक भाऊसाहेब हुलकांडे (रा. वांद्रे, मुंबई) हा तरुण पर्यटक गुरुवारी (ता. 22) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिरत असताना पाय घसरून कुंडात पडला.

सोबतच्या लोकांनी आरडाओरड करून स्थानिकांना गोळा केले. त्यातील काहींनी ही बातमी लेणीच्या कर्मचाऱ्यांकडे पोहोचवली. लेणी बंद करण्याच्या वेळी ड्यूटी संपवून पुन्हा निघालेल्या कर्मचाऱ्यांनी सप्तकुंडाकडे धाव घेतली. त्यातील एकाने खाली उतरून सर्व कुंडांमध्ये पर्यटकाचा शोध घेतला.

त्यानंतर दोर आणि सीट हार्नेस सोडून त्यास महत्प्रयासाने सुरक्षित वर काढले. खळाळत्या पाण्याच्या जोरामुळे भांबावलेल्या या पर्यटकाला धीर दिल्यानंतर काही वेळाने तो भानावर आला. प्रथमोपचार आणि पुढील कार्यवाहीसाठी त्याला पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाचे अधिकारी ज्ञानेश्‍वर दानवे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com