विस्थापित शिक्षकांनाही समुपदेशनाने पुन्हा नियुक्ती 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - 2018-19 व 2019-20 या दोन वर्षांत ऑनलाइन बदल्यांमध्ये अनेक शिक्षक विस्थापित झाले. यात महिला शिक्षिकांची अतिशय गैरसोय झाली. यातील सर्व अन्यायग्रस्त शिक्षकांना पवित्र पोर्टल भरतीपूर्वी समानीकरणाच्या जागा खुल्या करून समुपदेशनाने पुन्हा नियुक्ती देऊ, असे आश्‍वासन शिक्षण सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिले होते. विशेष करून महिला शिक्षिकांसाठी श्री. गुप्ता यांनी हे आश्‍वासन पाळले आणि आज तशा आशयाचे पत्रही त्यांनी काढले. त्यानुसार विस्थापित शिक्षकांनाही समुपदेशनाने पुन्हा नियुक्ती (पदस्थापना) दिली जाणार आहे. यामुळे महिलांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. 

वर्ष 2018-19 मध्ये पहिल्यांदाच ऑनलाइन बदल्या झाल्याने पाचव्या व सहाव्या राऊंडपर्यंत बदल्यांची प्रक्रिया गेली होती. यात अनेकजण रॅंडम राऊंडमध्ये आले. त्यांना अतिशय दूरवरील गावच्या शाळा मिळाल्या होत्या. दुसऱ्या वर्षी म्हणजे वर्ष 2019-20 मध्ये ऑनलाइन बदल्यांनतर विस्थापित शिक्षकांसाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र यासाठी उपलब्ध जागाच 100 ते 150 किलोमीटर दूर होत्या. शिक्षकांना नाइलाजाने त्यातील एका शाळेची निवड करावी लागली होती. यात एकल महिला शिक्षिकांची पार वाताहत झाली होती. त्यांचे संसार तुटण्याच्या मार्गावर होते. याविषयी शिक्षक समिती, शिक्षक सेना, शिक्षक भारतीसह विविध संघटनांनी आवाज उठविला होता. माध्यमांनीही याचा पाठपुरावा केला. याची दखल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि सचिव श्री. गुप्ता यांनी घेतली. विशेषतः महिला शिक्षिकांबाबत त्यांनी कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्याचेच फलित म्हणून या शिक्षकांना पवित्र पोर्टल भरतीपूर्वी समानीकरणाच्या सर्व जागा ओपन करून त्या जागेवर समुपदेशन पद्धतीने नियुक्ती द्यावी, असा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे. 

शिक्षक-शिक्षिकांच्या गैरसोयींचा विचार करून वरिष्ठ पातळीवर आजचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला. आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने न्यायाच्या भूमिकेतून समानीकरणाच्या सर्व म्हणजे 100 टक्के जागा खुल्या कराव्यात. असे केल्यास कुणीही अन्यायग्रस्त राहणार नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षक समितीचे नेते विजय साळकर यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com