पन्नाशी ओलांडलेल्यांची भरली शाळा

औरंगाबाद - मौलाना आझाद हायस्कूलमध्ये पीटीच्या तासाला उभे असलेले १९७४ च्या बॅचचे पन्नाशी ओलांडलेले माजी विद्यार्थी.
औरंगाबाद - मौलाना आझाद हायस्कूलमध्ये पीटीच्या तासाला उभे असलेले १९७४ च्या बॅचचे पन्नाशी ओलांडलेले माजी विद्यार्थी.

औरंगाबाद - वयाची पन्नाशी ओलांडलेले विद्यार्थी सकाळी दहा वाजता गणवेशात शाळेच्या प्रांगणात रांगेत उभे राहिले. प्रत्येकांच्या गळ्यात त्यांचे ओळखपत्र. शाळेची प्रार्थना झाल्यानंतर शरीराने थकलेल्या; मात्र मनाने उत्साही असलेल्या पीटी शिक्षकांनी त्यांचा पीटीचा तास घेतला आणि प्रत्येकजण आपापल्या वर्गात जाऊन बसले. पाच-सहा विद्यार्थी उशिरा आले; तेव्हा शिक्षकांनी ४५ वर्षे झाली तरी वर्गात उशिरा येण्याची सवय काही गेली नाही म्हणत त्यांना वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षाही दिली. हे चित्र रविवारी (ता. सहा) टाऊन हॉल येथील मौलाना आझाद हायस्कूलमध्ये पाहायला मिळाले. 

मौलाना आझाद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वर्ष १९७४ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळून रविवारी (ता. सहा) ‘एक दिवस शाळेचा’ हा उपक्रम घेतला आणि ४५ वर्षांपूर्वीच्या शाळेतील दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या बॅचमध्ये २०० विद्यार्थी; तर ४० शिक्षक होते. यापैकी प्रत्येक जण विविध क्षेत्रांत आपापल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. काही शहरात, तर काही मराठवाडाभर विखुरले आहेत. काहीजण परदेशात असूनही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. २०० पैकी विद्यार्थी व शिक्षक मिळून १२२ जण उपस्थित होते. तहसीन अहमदखान, जहीर सिद्दिकी, मोहम्मद साजेद, मोहम्मद युनुस खत्री, जलाल खान, मोहंमद शकील अताउर्रहमान या १९७४ च्या बॅचमेटच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पीटी शिक्षक व्ही. ए. नीळकंठ यांनी पीटीचा तास घेतला. यावेळी तत्कालीन शिक्षक मोहम्मद अझर, अब्दुल खुद्दुस, आरेफ खुर्शिद, काजी अनीस, महेमूद उल्लाखान, सय्यद महेमूद, नदीम अहेमद खान, महम्मद युनुस, महम्मद मुस्ताफा, लतिफ कुरेशी आणि अब्दुल रज्जाक आदी उपस्थित होते. 

भरले ए ते ई तुकडीनुसार वर्ग
यानंतर सर्वजण ए ते ई तुकडीनुसार आपापल्या पूर्वीच्या वर्गात जाऊन बसले. विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी वर्गात त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर काही माजी विद्यार्थी, शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी संस्थेचे डॉ. गफ्फार कादरी यांनीही हजेरी लावून माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com