गळाला लागलेल्या विद्यार्थ्याकडून फुटले बिंग!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पेपर सोडविणाऱ्याने पोलिसांनाच विचारला पत्ता
पोलिसांनी आधी दिली लिफ्ट नंतर दाखवला खाक्‍या

पेपर सोडविणाऱ्याने पोलिसांनाच विचारला पत्ता
पोलिसांनी आधी दिली लिफ्ट नंतर दाखवला खाक्‍या

औरंगाबाद - सुरेवाडीत पोलिस दबा धरून होते, एक विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर त्याने चक्क साध्या वेशातील पोलिसांनाच एका ठिकाणचा पत्ता विचारला. पोलिसांनी त्याला लिफ्टही दिली, एका हॉटेलकडे नेऊन खाक्‍या दाखवताच नगरसेवक सिताराम सुरे यांच्या घरात सुरू असलेल्या गैरप्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी छापा घालून एकेकास गळाला लावले.

गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई सिद्धार्थ थोरात यांना खबऱ्याने नगरसेवक सुरे यांच्या घरात विद्यार्थ्यांची गर्दी असल्याची बाब सांगितली. संशय आल्याने थोरात यांनी सहकारी लालखॉं पठाण, योगेश गुप्ता यांना सोबत घेतले. मंगळवारी (ता. 16) रात्री अकरादरम्यान सुरेवाडीत धाव घेतली. परंतू, नगरसेवक सुरे यांची याच भागात दोन घरे असल्याने पोलिस बिचकले. त्यांना घरच सापडत नव्हते. तासभर वाट पाहिल्यानंतर पाठीवर बॅग घेतलेला एक विद्यार्थी एका घरातून बाहेर पडताना त्यांनी पाहिला. त्याला विचारणा केली असता, त्यावेळी अभियांत्रिकीच्या परीक्षेबाबत चर्चा विनिमय करण्यासाठी आलो होतो, असे सांगितले. परंतु त्याच्याकडून खात्रीशीर माहिती मिळत नव्हती, म्हणून पोलिसांनी अजून वाट पाहिली. दुसरा विद्यार्थी बाहेर येताच, त्यांनी विद्यार्थ्याची चौकशी केली. परंतु, तो जळगावचा असल्याने त्यानेच उलटप्रश्‍न करून पोलिसांना पत्ता विचारला. पोलिसांनी त्याला पत्ता सांगून लिफ्टही दिली. त्यानंतर एका वाईनशॉपजवळ नेऊन पोलिसांनी खरी ओळख सांगत कसून चौकशी केली व पोलिसी खाक्‍या दाखवला. त्यानंतर विद्यार्थ्याने सुरे यांच्या घरात परीक्षेचा पेपर सोडवला जात असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन छापा टाकला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, अनिल वाघ, राजेंद्र बांगर यांनी केली.

असा आहे घटनाक्रम
तीनच पोलिसांनी छापा घातला, त्यावेळी खोलीत तब्बल 27 विद्यार्थी होते. पेपर लिहिण्यातच ते मग्न होते, पोलिस आल्याचे सोयरसुतकही त्यांना नव्हते.
पोलिसांनी मोबाईल कॅमेरा ऑन करून एकेकाचे मोबाईल जप्त केले. तीन पोलिसांना एवढ्यापैकी काहीजण सहज गुंगारा देऊ शकले असते, पण पोलिसांनी शिताफीने त्यांना जखडून ठेवले होते.
वरिष्ठांना छापा घातल्याची बाब सांगण्यात आली. त्यानंतर गुन्हेशाखा पथक आले त्यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांना ताब्यात घेतले.
ज्योवळी छापा घातला, त्यावेळी सुरेंना थांगपत्ताही नव्हता. कुमक कमी असल्याने मुद्दामहून पोलिसांनी त्यांना पकडले. नव्हते, त्यांना पकडले असते, तर दबाव आणून त्यांनी सुटकाही केली असती म्हणून कुमक येण्याची तीन पोलिसांनी वाट पाहिली.

चिकलठाण्यातही मिळाल्या उत्तरपत्रिका..
पेपर सोडविण्यावेळी प्राध्यापक विजय आंधळे तेथे होता. त्याच्या चिकलठाणास्थित घरी गुन्हेशाखा पोलिसांनी छापा घातला, त्यावेळी घरात सुमारे पंचवीस उत्तरपत्रिका सापडल्या. या उत्तरपत्रिका पोलिसांनी जप्त केल्या.

उत्तरपत्रिकेवर सांकेतिक कोड
पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक-दोनच प्रश्‍न सोडवा, उर्वरित पेपर कोरा सोडा, असे नियोजित पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले जात होते. तसेच विशिष्ट सांकेतिक कोड मागच्या बाजूने लिहिला जात होता. विशेषत: पेपरवर कोऱ्या जागी लाल रेषाही मारल्या जात नव्हत्या. परीक्षा संपल्यानंतर हे पेपर स्ट्रॉंग रूममध्ये ठेवून रात्री बाहेर काढून पुन्हा सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना दिले जात होते.

हे प्रश्‍न अनुत्तरीत...
केंद्रावर परीक्षा होताच, पेपर विद्यापीठाच्या ताब्यात का देण्यात आले नाहीत.
विद्यापीठाकडून पेपर उशिराने का घेतले जातात
गैरप्रकार सुरू असल्याचे यापूर्वीची माहिती असतानाही परीक्षा केंद्र का दिले गेले
पेपरचे गठ्ठे खरेच सील केले होते का? त्यावर सह्या घेतल्या होत्या का?
विद्यापीठातून गोलमाल करणाऱ्या संस्थेला बळ कुणाचे
विद्यापीठातील जबाबदारांनी या केंद्रावर जाणीवपूर्वक लक्ष दिले नव्हते का?

Web Title: exam paper cheating by student