गुन्हेगारांमध्ये खळबळ : परभणीच्या नानलपेठ पोलिसांनी १४ गुंडांना केले हद्दपार

गणेश पांडे
Tuesday, 23 February 2021

टोळीप्रमुख लक्ष्मण अच्युत गायकवाड, अनिल अच्युत गायकवाड यांना सहा महिने तर टोळी सदस्य सुरेश रामभाऊ पवार, आकाश राजेश जाधव यांना तीन महिन्यांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले

परभणी ः शहरात गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणाऱ्या १४ गुंडाच्या टोळीस पोलिस अधिक्षकांनी हद्दपार केले आहे. मंगळवारी (ता. २३) या संदर्भात पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी आदेश बजावले आहेत.

टोळीप्रमुख लक्ष्मण अच्युत गायकवाड, अनिल अच्युत गायकवाड यांना सहा महिने तर टोळी सदस्य सुरेश रामभाऊ पवार, आकाश राजेश जाधव यांना तीन महिन्यांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या टोळीस जालना व माजलगाव (जि. बीड) येथे नेऊन सोडले आहे. या टोळीतील सदस्यांनी २०१४ पासून आजतागायत लक्ष्मण गायकवाड, अनिल गायकवाड, सुरेश पवार, आकाश जाधव, दिलीप जाधव, मारोती जाधव, करण जाधव, शिवाजी जाधव यांनी अनेक गुन्हे केले होते. या टोळी विरोधात विविध गंभीर स्वरुपाच्या १३ गुन्ह्याची नोंद आहे. गेल्या चार महिन्यात पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विलास ज्ञानोबा मुंडे व नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नितेश उर्फ भैय्या प्रकाश देशमुख यांच्या टोळीतील टोळी प्रमुखांसह दहा सदस्यांना व चालू हद्दपार कारवाईत चार अशा एकूण १४ गुंडांना आतापर्यंत हद्दपार केल्या गेले.

वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक जप्त

परभणी ः विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रक वसमत रस्त्यावर मंगळवारी (ता. २३) सकाळी पोलिसांच्या विशेष पथकाने जप्त केला. या कारवाईत सात लाख १५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी मंगळवारी सकाळी गस्त घालत असताना वसमत रस्त्यावरील एका पेट्रोलपंपासमोर वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक पथकास आढळला. पथकाने ट्रकचालकास वाळूबाबत विचारणा केली. मात्र, ट्रकचालकाने पथकास माहिती देण्यास टाळाटाळ केली. पथकातील फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ट्रक ताब्यात घेत नवामोंढा पोलिसांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, दीपक मुदीराज, अजहर पटेल, अरुण कांबळे, दीपक मुंडे, विष्णू भिसे यांनी केली.

संपादन - राजन मंगरुळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excitement among criminals: Parbhani's Nanalpeth police deported 14 accused parbhani news