व्यायाम करा अन् आजार टाळा

शिवचरण वावळे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश, गुदद्वारावर जोर देणे,  सतत उन्हात हिंडणे. कमी पाणी पिणे, लघवी पिवळी होणे. अश्या प्रकारच्या समस्या ज्यांना असतील त्यांना मूळव्याधीचा धाेका असताे.

नांदेड : व्यायामाचा अभाव, आहारात तंतूमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण (गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रूक्ष पदार्थ खाणे, अति तिखट सेवन, सतत बैठे काम, व्यायामाचा अभाव, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश, गुदद्वारावर जोर देणे,  सतत उन्हात हिंडणे. कमी पाणी पिणे, लघवी पिवळी होणे. अश्या प्रकारच्या समस्या ज्यांना असतील त्यांना मूळव्याधीचा धाेका असताे.

आजच्या तरूणाईचे कामाचे स्वरूप पाहता त्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल केल्यास याचा धाेका टाळता येताे.  
जागतिक मूळव्याध दिन २० नोव्हेंबरला साजरा केला जातो. मूळव्याध हा मानवी शरीराच्या मूळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. या रोगास संस्कृतमध्ये ‘अर्श’ असे नाव आहे. काही वर्षापूर्वी मूळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता या आजाराने १८ ते २५ या वयोगटातील स्त्री-पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागला आहे. एकूणच सध्याची आकडेवारी बघता मूळव्याधीच्या एकूण रूग्णांपैकी १० ते १२ टक्के रूग्ण हे १८ ते २५ वयोगटातील असल्याची माहिती मूळव्याध तज्ज्ञ डॉ. राजेश पंडीत यांनी सांगितले.

दोन प्रकारचे रोग

यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत. ज्यात विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) व रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध). या रोगात गुदद्वाराच्या सभोवताली आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास व्यक्ती मध्ये रक्त कमतरता (अॅनेमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होऊ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे.भारतात आजघडीस (२०१९) साधारणतः चार कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रूग्ण नव्याने तयार होत असतात. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणुन व्यायाम करावा,  त्यामुळे पचनसंस्था सुधारते.

मूळव्याधीचे पूर्वरूप

मूळव्याध येण्याआधी आपले शरीर आपल्याला त्याची जाणीव करून देते. उदाहरणार्थ – सूज येणे, अग्निमंद, अन्न न पचणे, बलहानी, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे, गुडघेदुखी इत्यादी. अश्या प्रकारच्या समस्यांना आपण जेव्हा कानाडोळा करतो तेंव्हाच मूळव्याधीचा त्रास होण्यास सुरवात होते आणि ती हळूहळू वाढू लागते.

मुळव्याधाचे प्रकार

साधारणपणे गुदद्वाराच्या ठिकाणी कुठलेही लक्षण जाणवलं, की मला आता मुळव्याध झाला आहे, अशी प्रत्येक रूग्णाची भावना असते. गुदद्वाराजवळ अनेक आजार होतात आणि त्याची प्रत्येक सामान्य व्यक्तीस कल्पना नसते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी काहीही लक्षण जाणवलं, की मला आता मुळव्याध झाला आहे असंच वाटतं. परिकर्तिका (फिशर), भगंदर, बद्धकोष्ठता, गुदाभ्रंश आणि मूळव्याध असे अनेक आजार गुदभागाजवळ आणि गुदभागामध्ये होत असतात. मुळव्याधही अनेक प्रकारचा असतो किंवा मूळव्याध या व्याधीचे प्रकार आहेत.

अंतर्गत मुळव्याध

गुदभागाच्या आतील बाजूस मुळव्याधीच्या नसा फुगून जी व्याधी होते. त्यास अंतर्गत मुळव्याध असं म्हणतात. या आजारात प्राथमिक लक्षणं जास्त नसतात. शौचास साफ न होणं असं एक लक्षण असतं; परंतु वेदना, दाह कमी असतो. या व्याधीमध्ये शौचासोबत रस्त जाणं जास्त वेळा आढळतं.

बाह्य मुळव्याध

गुदद्वाराच्या बाह्य भागामध्ये म्हणजे अगदीच गुदद्वाराजवळ होणारे मुळव्याध खरे तर आतील मुळव्याधीच्या नसा जास्त फुगून त्या गुदद्वाराच्या बाहेेर येऊ लावातात व त्यातच बाह्य मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारात वेदना व दाह अत्याधिक असतो. रूग्णाला बसण्यासही त्रास होतो.

मुळव्याधीचे अवस्थेनुसार मुख्य चार प्रकार

अवस्था एक : अल्पवेदना, जडपणा, क्वचित दाह अशी लक्षणं या अवस्थेत असतात. प्राथमिक अवस्थेतील हा मुळव्याध केवळ औषधोपचारानं बरा होतो. अवस्था दाेन : शौचाच्या वेळी वेदना, रक्तस्त्राव होणं, शौचास आग होणं, टोचल्यासारखे दुखणं अशी लक्षणं असतात. शौचाच्या वेळी मुळव्याध बाहेर येतात आणि शौचानंतर आपोआप जागेवर जातात. अवस्था तीन : शौचाच्या वेळी आणि नंतर वेदना, रक्तस्त्राव, आग होणं, खाज येणं, टोचल्यासारखं दुखणं ही लक्षणं वाढतात. शौचाच्या वेळी बाहेर येणारे मुळव्याध हातानं दररोज आत ढकलावे लागतात. अवस्था चार: या प्रकारात वरील लक्षणं वाढतात आणि मुळव्याधीचा बाहेर येणारा भाग हातानं ढकलूनही आत जात नाही. अवस्था एक व दाेन या औषधोपचाराने बऱ्या होतात; परंतु अवस्था तीन व चारमध्ये शस्त्रक्रीयेशिवाय मुळव्याध पूर्णपणे बरा होत नाही.

मूळव्याधाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील मोडाची मुळव्याध हा एक आहे. यामध्ये रक्तस्त्राव नसतो. हा प्राथमिक अवस्थेतील मुळव्याध औषधोपचाराने बरा होताे. रक्ती मुळव्याध ही अत्यायिक अवस्था असते, आणि यामध्ये अत्यायिक ‌चिकित्सा करून त्याचा उपचार करावा लागतो. बऱ्याच वेळा अशा अवस्थेत शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. - डॉ. राजेश पंडीत. मुळव्याध तज्ज्ञ.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exercise and avoid illness