औरंगाबादमध्ये वैयक्तिक वादांना धार्मिकतेचा रंग

मनोज साखरे
मंगळवार, 23 जुलै 2019

 सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही सेकंदांचाच वाद दिसतो. एवढ्या कमी कालावधीत जबरदस्तीने "जय श्रीराम' म्हणायला लावले, असे म्हणणे हे अतिशयोक्ती ठरते.

औरंगाबाद - शहरात तीन दिवसांत मारहाण करून जबरदस्तीने 'जय श्रीराम' म्हणायला लावल्याच्या दोन घटना पोलिस तपासात फोल ठरल्या आहेत. 19 जुलैला हडको कॉर्नर व 21 जुलैला मध्यरात्री आझाद चौक परिसरात घडलेल्या घटना किरकोळ असून, त्याला धार्मिक रंग देऊन दोन समुदायांमध्ये ध्रुवीकरणाचाच डाव असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

बजरंग चौक ते आझाद चौकादरम्यान रविवारी मध्यरात्री कारमधील तरुण व दुचाकीस्वारांत वाद झाला. या वादाला धार्मिक रंग देण्यात आला. त्या घटनेत व त्यापूर्वीच्या हडको कॉर्नर येथे अशाच पद्धतीने घडलेल्या घटनेत केवळ तात्कालिक कारणे समोर आली. याबाबत पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले, की दोन दिवसांत ज्या घटना घडल्या त्यांचे अवलोकन केले. त्यात असे दिसून येते की, या किरकोळ घटना आहेत. यात दोन समुदायांचे लोक सहभागी आहेत. मॉब लिंचिंग म्हणणे योग्य नाही. पोलिस तपास करीत आहेत. लोकांना आवाहन आहे की, कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही सेकंदांचाच वाद दिसतो. एवढ्या कमी कालावधीत जबरदस्तीने "जय श्रीराम' म्हणायला लावले, असे म्हणणे हे अतिशयोक्ती ठरते. अशा घटनांमागे कोणीतरी असून त्यांना अशा घटनांना धार्मिक रंग द्यायचा असल्याचा संशय येत आहे. मात्र अशाप्रकारे धार्मिक ध्रुवीकरणाचे डाव सफल होऊ देणार नाही, असे पोलिस आयुक्त म्हणाले. 
 
सिडकोतील बजरंग चौक येथे किरकोळ प्रकार घडला. त्याचे सीसीटीव्हीत चित्रण झाले. त्यातील फुटेजनुसार... 
 

  • 1 ते 30 सेकंदांपर्यंत एक कार रस्त्यावरून वळविली जात होती. 
  • यावेळी काही वाहने कारच्या आजुबाजूने गेली. 
  • 45 व्या सेकंदाला एक बस आली. बसचालक व कारचालक यांच्यात 
  • थोडी बातचित. 30 सेकंदांनंतर बस पुढे जाते. 
  • 90 व्या सेकंदाला डिलिव्हरी करणारे दुचाकीस्वार येतात. 
  • 50 सेकंद कारमधील व्यक्ती व त्या दुचाकीस्वारांत बातचित, वाद. 

 

बेजबाबदार सोशल मीडियाविरुद्ध कारवाई 
किरकोळ वादाच्या घटनेला मॉब लिंचिंग, दंगल असे दाखविण्याचे प्रकार शहरातीलच काही वेबपोर्टलकडून होत आहेत. रविवारच्या घटनेचेही काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. अशा बेजबाबदार लोकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. सायबरकडून व्हिडिओ, कॉमेंट टाकणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. इंटरनेटवर भडकावू शीर्षक देऊन अशा प्रकारची घटना प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाई करणार आहोत, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. 
  
रात्री नऊ ते बारापर्यंत नाकाबंदी 
या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्व पोलिस उपायुक्त, पोलिस निरीक्षकांची बैठक पार पडली. त्यात अशाप्रकारच्या घटना गांभीर्याने घेऊन वेळीच उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या गेल्या. शहरात रात्री नऊ ते बारापर्यंत प्रमुख भागांत नाकाबंदी करण्यात येणार आहे. 
 
मॉब लिंचिंग नाही 
इम्तियाज जलील (खासदार) ः
बजरंग चौक ते आझाद चौकादरम्यान घडलेली घटना मॉब लिंचिंग नाही. काही नशेखोर टोळके रात्री फिरत असतात. त्यांच्याकडून मारहाणीचे, धाक-दडपशाहीचे प्रकार होतात. नशापानामुळे असे प्रकार घडत असून, मादक द्रव्य विक्रेत्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Explained: A Background To What's Happening at Aurangabad